मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत (एमएमआरडीए) विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडील सुमारे १७ हजार पदांच्या भरतीकरीता कौशल्य विकास विभागामार्फत ६ जुलैपासून पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात २ हजार ९२३ पदांची भरती केली जाणार आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई व राज्यातील इतर जिल्ह्यातून बरेच कुशल, अर्धकुशल, अकुशल कामगार स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे एमएमआरडीएच्या माध्यमातून महानगर प्रदेशात सुरू असलेल्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी सध्या मजुरांची टंचाई जाणवत असून ती दूर करण्यासाठी ही मोहिम हाती घेण्यात आली आहे.

एमएमआरडीए अंतर्गत कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडे सुमारे १७ हजार गवंडी, सुतारकाम, फिटर (स्टील फिक्सींग करणारे), फिटर (बार बेंडिंग व फिक्सिंग करणारे), वेल्डर, इलेक्ट्रिशियन व वायरमन अशा शैक्षणिक पात्रतेच्या कुशल आणि अकुशल कामगार मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यापैकी ऑनलाइन मेळाव्याच्या पहिल्या टप्प्यात २ हजार ९२३ पदे भरली जाणार आहेत.

ही विविध प्रकारची रिक्तपदे विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. रिक्तपदे मुख्यत: मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातील आहेत. ही पदे भरण्यासाठी ६ ते १२ जानेवारी दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजता कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाइन रोजगार मेळावे होणार आहेत.