मेगाब्लॉक मात्र लांबला

मध्य रेल्वेवरील परळ स्थानकातील नवीन फलाट रविवारपासून प्रवाशांच्या सेवेत आला. परळ टर्मिनस प्रकल्पातील नवीन फलाट हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. रविवारी आठ तासांचा विशेष मेगाब्लॉक घेऊन हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न होता, मात्र काम वेळेत पूर्ण न झाल्याने ब्लॉकची वेळ आणखी एक तासाने वाढली आणि त्यानंतर काम पूर्ण होताच नवीन फलाट प्रवाशांच्या सेवेत आला.

या फलाटावरून सायंकाळी सीएसएमटीहून परळ स्थानकात आलेली ६.२९ वाजताची कल्याण लोकल रवाना करण्यात आली. परळ स्थानकातील सध्याचा एक नंबर फलाट हा टर्मिनसच्या आणखी काही कामांसाठी बंद केला जाणार आहे. या फलाटातून ठाणे, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाडय़ा नवीन एक नंबर फलाटातून सोडण्याचे नियोजन असल्याची, माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

दादर स्थानकात वाढत जाणारी प्रवाशांची गर्दी आणि त्यामुळे लोकल गाडय़ांवर पडणारा ताण, तसेच परळ स्थानकातही गेल्या काही वर्षांत प्रवाशांची वाढलेली वर्दळ पाहता रेल्वेने परळ टर्मिनस उभारण्याचा निर्णय घेतला आहे. टर्मिनस प्रकल्पात या स्थानकातील सध्याच्या एक नंबर फलाटातून ठाणे, कल्याणच्या दिशेने लोकल सोडण्याचे नियोजन आहे. या टर्मिनससाठी ९० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून आतापर्यंत  प्रकल्पातील गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेले नवीन फलाटाचे काम रविवारी पूर्ण करण्यात आले. या कामासाठी रविवारी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात आला. परळ ते दादर दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर नवीन रूळ, ओव्हरहेड वायर यासह अन्य तांत्रिक कामे करण्यात आली. हे काम करताना भायखळा ते माटुंगा दरम्यान धीम्या लोकल गाडय़ा जलद मार्गावर वळवण्यात आल्या. मात्र ब्लॉकमध्ये करण्यात येणारे काम नियोजित वेळेत संपुष्टात आले नाही. त्यामुळे ब्लॉकची वेळ एक ते दीड तासांनी वाढली. ब्लॉक दरम्यान करी रोड आणि चिंचपोकळी स्थानकातील धीमा मार्ग प्रवाशांना उपलब्ध होणार नव्हता. ब्लॉक लांबल्याने त्याचा प्रवाशांना मनस्ताप झाला. दरम्यान, काम पूर्ण होताच सायंकाळी परळ स्थानकातील नवीन फलाटातून सीएसएमटी स्थानकातून आलेली कल्याण लोकल रवाना करण्यात आली. यानंतर परळ स्थानकातील सध्याचा एक नंबर फलाट परळ टर्मिनसच्या पुढील कामांसाठी बंद करण्यात येणार आहे.

तीन ठिकाणी स्वतंत्र रॅम्प

नवीन फलाट आणि सध्याच्या जुन्या फलाटादरम्यान तीन ठिकाणी स्वतंत्र रॅम्प उभारण्यात आले आहे. पादचारी पूल जोडण्यासाठी सध्या काही व्यवस्था नसल्याने प्रवाशांना नवीन फलाटावर जाणे कठीण आहे. त्यामुळेच ही व्यवस्था करण्यात आली आहे.

फलाट क्रमांक १ बंद

परळ टर्मिनससाठी सध्याच्या एक नंबर फलाटातून ठाणे, कल्याणच्या दिशेने लोकल सोडण्याचे नियोजन आहे. त्याच कामासाठी सध्याचा एक नंबर फलाट बंद करण्यात आला आहे. हे काम मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होईल. सध्याचा नवीन फलाट पंधरा डबा लोकल गाडय़ाही थांबू शकतील, अशा पद्धतीने बनवण्यात आला आहे.