जागा शोधण्याच्या आयुक्तांच्या आदेशांना हरताळ

सचिन धानजी, मुंबई</strong>

मुंबईतील वाहनतळांचा प्रश्न सोडविण्यासाठी आपापल्या परिसरातील वाहनतळाकरिता योग्य जागा निवडून त्या बाबतचा अहवाल सादर करण्याच्या महापालिका आयुक्तांच्या आदेशाला विभागीय सहायक आयुक्तांनी हरताळ फासला आहे. दीड वर्ष झाले तरी मुंबईतील वाहनतळांची संख्या जैसे थेच आहे.

मुंबईत रस्त्यांवर ९१ वाहनतळ असून ते ३०० पर्यंत नेण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले होते. मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे वाहनतळांच्या संख्येत वाढ झालेली नाही. आयुक्तांनी दीड वर्षांपूर्वी या संदर्भात आदेश दिले होते. मात्र एकाही सहायक आयुक्तांनी त्याची अंमलबाजवणी न केल्याने वाहनतळांची समस्या कायम आहे.

मुंबईत महापालिकेचे ‘रस्त्यावरील वाहनतळ’ व ‘रस्त्याव्यतिरिक्त वाहनतळ’ अशी प्रामुख्याने दोन प्रकारचे वाहनतळ आहेत. सध्या मुंबईमध्ये ९१ रस्त्यांवरील वाहनतळ असून २९ ठिकाणी रस्त्यांव्यतिरिक्तचे वाहनतळ आहेत. मुंबईकरांची गरज लक्षात घेता ही संख्या कमी आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी ४ मार्च, २०१७ रोजी झालेल्या मासिक सभेत रस्त्यांवरील वाहनतळांची संख्या ३०० पर्यंत वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक ती प्राथमिक कार्यवाही ३० एप्रिल २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश रस्ते व वाहतूक विभागाचे प्रमुख अभियंता आणि सर्व २४ प्रशासकीय विभागांच्या सहायक आयुक्तांना दिले होते.

आयुक्तांच्या आदेशानुसार सर्व सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या क्षेत्रातील कोणत्या भागात वाहनतळांची अधिक गरज आहे, त्याकरिता कुठे वाहनतळ निर्माण करता येतील याची पाहणी करून त्याबाबतची माहिती तातडीने रस्ते व वाहतूक विभागाचे प्रमुख अभियंत्यांना द्यायची होती. रस्ते व वाहतूक विभागाचे प्रमुख अभियंता विनोद चिठोरे यांना विचारले असता विभागाच्या सहायक आयुक्तांकडून वाहनतळांबाबत कोणताही अहवाल सादर झाला नसल्याचे स्पष्ट केले.

९१ रस्त्यावरील वाहनतळ ११२७१ वाहनतळांची क्षमता  वाहनतळांची निविदा प्रक्रिया

* प्रत्येक विभागातील वाहनतळांकरिता प्रायोगिक तत्त्वावर कंत्राटदारांची निवड करण्याचे अधिकार विभागाच्या सहायक आयुक्तांना आहेत. त्यानंतर यशस्वीपणे वाहनतळ चालविणाऱ्या कंत्राटदारांमधून निविदा काढल्या जातात.

* वाहनतळांच्या वाटप धोरणानुसार एकूण वाहनतळाच्या ५० टक्के वाहनतळ महिला बचत गटांसाठी आरक्षित आहेत. तर उर्वरित २५ टक्के नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार संस्थांसाठी, २५ टक्के खुल्या गटासाठी राखीव आहेत. त्यानुसार सध्या निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

* ९१ वाहनतळांपैकी कुलाबा, नरिमन पॉइंट या ‘ए’ विभागात ४७ वाहनतळ आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात काही वाहनतळांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित वाहनतळांसाठीची निविदा प्रक्रिया सुरू असून त्यालाही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र, आता अन्य भागांतील ३५ वाहनतळांसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.