प्रवाशांना सहकार्याचे आवाहन; ठाणे-डोंबिवली जलद गाडीचा प्रवास १४ मिनिटांत
ठाणे-डोंबिवली या स्थानकांदरम्यान सध्या कूर्मगतीने प्रवास करणाऱ्या जलद गाडय़ा आठवडय़ाभरात पुन्हा वाऱ्याच्या वेगाने धावू लागणार आहेत. पारसिक बोगद्यातील रूळांखालील खडी बदलण्याचे काम चालू असल्याने सध्या जलद गाडय़ा ठाणे-डोंबिवली हे १४ मिनिटांचे अंतर कापण्यासाठी अध्र्या तासाहून जास्त कालावधी घेत आहेत. आता हे काम अंतिम टप्प्यात आले असून त्यानंतर सध्या पारसिक बोगद्यात असलेली ताशी ३० किमीची वेगमर्यादा शिथिल होणार आहे. त्यामुळे हे अंतर पुन्हा एकदा १४ मिनिटांत कापणे शक्य होणार आहे, मात्र त्यासाठी आठवडाभर कळ सोसा, असे आवाहन मध्य रेल्वेने प्रवाश्यांना केले आहे.
डीसी-एसी परिवर्तन झाल्यापासूनच पारसिक बोगद्याजवळ ताशी ३० किमीची वेगमर्यादा लावण्यात आली आहे. तेव्हापासूनच मध्य रेल्वेच्या लाखो प्रवाशांना दर दिवशी मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच गेल्या १५ ते २० दिवसांपासून मध्य रेल्वेने पारसिक बोगद्यात रूळांखालील खडी बदलण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे डोंबिवलीला जाणारी गाडी ठाण्याहून सुटल्यानंतर किंवा दिव्याहून ठाण्याकडे येणारी गाडी मुंब्रा खाडीजवळ आल्यानंतर अचानक धीमी होते. ही गाडी ठाण्याहून पारसिक बोगद्यापर्यंत पोहोचण्यासाठीच २० मिनिटांचा अवधी लागत आहे. परिणामी प्रवाशांचा संताप शिगेला पोहोचला आहे.
रूळांखाली टाकण्यात येणारी खडी रूळांना आधार देण्याचे काम करते. लोकल किंवा लांब पल्ल्याच्या गाडय़ा वेगात जाताना गाडय़ांनाही हादरे बसू नयेत, यासाठी ही खडी खूप महत्त्वाचे काम करते. पारसिक बोगद्यात सातत्याने पाणी झिरपत असून त्यामुळे रूळांखालील खडी ठिसूळ झाली आहे. ती बदलण्यासाठी रेल्वेने हे काम हाती घेतले आहे, मात्र त्याबद्दल प्रवाशांना काहीच माहिती देण्यात आलेली नाही. हे काम पूर्ण झाल्यानंतर पारसिक बोगद्यातील रूळांची छतापासूनची उंचीही कमी होणार आहे. त्यामुळे डीसी-एसी परिवर्तनानंतर या बोगद्यात लावण्यात आलेली ताशी ३० किमीची वेगमर्यादा हटवणे शक्य होणार आहे. ही वेगमर्यादा हटली की, पुन्हा एकदा जलद गाडय़ा ठाणे-डोंबिवली दरम्यानचे अंतर १४ ते १५ मिनिटांत कापतील. पण त्यासाठी प्रवाशांना फक्त एका आठवडय़ाची कळ सोसावी लागेल, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

पारसिक बोगद्यातील खडी बदलण्याचे काम महत्त्वाचे आहे, त्यामुळे प्रवाशांचाच फायदा होणार आहे, यात वाद नाही. मात्र रेल्वेने याबाबत प्रवाशांना विश्वासात घेऊन माहिती देणे अपेक्षित होते. कोणतीही माहिती न देता दर दिवशी प्रवाशांची रखडपट्टी करण्याचे रेल्वेचे धोरण चुकीचे आहे.
– नंदकुमार देशमुख ,अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना ठाणे</strong>