‘टीआरपी’ घोटाळा प्रकरणातील अन्य आरोपींना कनिष्ठ न्यायालयाने जामीन मंजूर केला, मग आपल्याला जामीन का दिला जात नाही, असा प्रश्न या प्रकरणी अटकेत असलेले बार्कचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांनी सोमवारी उच्च न्यायालयात उपस्थित केला.

तसेच मुंबई पोलिसांच्या मते रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी हे या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावाही दासगुप्ता यांच्यातर्फे करण्यात आला. मात्र, पुरवणी आरोपपत्रानुसार, दासगुप्ता हेच या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा पोलिसांतर्फे करण्यात आला. तसेच त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांतर्फे न्यायालयात सांगण्यात आले.

न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यापुढे सोमवारी या प्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळी दासगुप्ता यांची प्रकृती स्थिर असल्याचे आणि तळोजा कारागृह त्यांची योग्य ती काळजी घेतली जात असल्याचे सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी सांगितले. तसेच आवश्यकता भासल्यास त्यांना जेजे वा वाशी रुग्णालयात पाठविण्यात येईल, असा दावाही पोलिसांतर्फे करण्यात आला, तसेच दासगुप्ता यांना जामीन देण्यास विरोध केला.

दासगुप्ता यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वारंवार कमी होऊन ते बेशुद्ध पडतात. त्यांची ही स्थिती लक्षात घेता त्यांना अंतरिम जामीन देण्याची मागणी दासगुप्ता यांच्यातर्फे अ‍ॅड्. शार्दूल सिंग यांनी केली. तसेच प्रकरणातील अन्य आरोपींना कनिष्ठ न्यायालयाकडून जामीन मंजूर झालेला असताना आपल्याला का नाही, असा सवाल दासगुप्ता यांच्यातर्फे उपस्थित करण्यात आला.

या प्रकरणी मुख्य आरोपी कोण आहे आणि दासगुप्ता यांची भूमिका नेमकी काय आहे, अशी विचारणा न्यायालयाने केली. त्या वेळी अर्णब गोस्वामी हे मुख्य आरोपी असल्याचा दावाही दासगुप्ता यांच्याकडून करण्यात आला. न्यायालयाने दासगुप्ता यांच्या जामिनावरील सुनावणी २ फेब्रुवारीला ठेवली आहे.

गुन्हे शाखा आणखी एक पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत

* बहुचर्चित ‘टीआरपी’ घोटाळ्याप्रकरणी गुन्हे शाखा आणखी एक पुरवणी आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्याच्या तयारीत आहे. या आरोपपत्रात बार्कचे (ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पाथरे दासगुप्ता यांनी मोबाइलमधून हटविलेले किंवा खोडलेले संवाद, छायाचित्रे, तक्ते आदी साहित्याचा समावेश असेल, असा दावा एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी केला.

* हे दुसरे पुरवणी आरोपपत्र असून पहिल्या पुरवणी आरोपपत्राद्वारे दासगुप्ता आणि रिपब्लिक वाहिन्यांचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यातील संवादांची मालिका गुन्हे शाखेने पुरावा म्हणून न्यायालयात सादर केली होती.

* दासगुप्ता यांच्या मोबाइल तपासणीतून अर्णब यांच्यासोबतचे व्हॉट्सअ‍ॅप संवाद हाती लागले होते. मात्र या संवादातील बराचसा अंश, छायाचित्रे, तक्ते, ध्वनिचित्रफिती आदी या दोघांनी वेळोवेळी डिलीट केल्याचे आढळले होते. ते गुन्हे शाखेने पुन्हा मिळवले असून त्यातील काही भाग या पुरवणी आरोपपत्रात पुरावा म्हणून जोडण्यात येईल, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

* याशिवाय दासगुप्ता यांना महत्त्वाच्या विषयावरील संवादाचे छायाचित्र (स्क्रीनशॉट) काढण्याची सवय होती. ‘टीआरपी’ घोटाळ्यात अटक होईल अशी परिस्थिती निर्माण होताच दासगुप्ता यांनी तीही मोबाइलमधून हटविली होती. असे सुमारे एक हजारांहून अधिक स्क्रीनशॉट हाती लागले असून त्यापैकी काही आरोपपत्रात सहभागी केले जातील. महत्त्वाचा पुरावा ठरतील अशी अन्य कागदपत्रे, तज्ज्ञांची निरीक्षणे, फॉरेन्सिक ऑडिट अहवालाचा निष्कर्षही दुसऱ्या पुरवणी आरोपपत्रात असतील, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.