मुंबई : ओला कंपनीचे जुने अ‍ॅप वापरून प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई विमानतळ ते नेरुळ, सानपाडा, पनवेल अशा प्रवासादरम्यान अ‍ॅपच्या जीपीएस प्रणालीत तांत्रिक बदल करून हे आरोपी प्रवाशांकडून दीडपट ते दुप्पट भाडे आकारत होते. सुमारे ५० ओला चालकांकडून अशा प्रकारे प्रवाशांची फसवणूक सुरू होती.

ओला कंपनीच्या कॅब सुविधेमार्फत प्रवासासाठी चालकांकडून वापरले जाणारे अ‍ॅप कंपनीने अद्ययावत केले होते. मात्र काही चालकांनी जुन्याच अ‍ॅपच्या माध्यमातून व्यवसाय सुरू ठेवला. प्रवासादरम्यान जीपीएस यंत्रणा तीन ते चार वेळा बंद करून पुन्हा सुरू केल्यास अंतरात ३० ते ३५ किलोमीटरची वाढ होत असे. यातून प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे आकारण घेतले जात असे. विमानतळावरील सुमारे ५० चालकांनी ही शक्कल लढवून जुन्याच अ‍ॅपच्या माध्यमातून व्यवसाय सुरू ठेवला.

याबाबत गुन्हे शाखेच्या कक्ष १ला माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पडताळणीसाठी प्रत्यक्ष ग्राहकाला पाठविले. या ग्राहकाच्या प्रवासात विमानतळ ते पनवेल या सुमारे ४४ किमीऐवजी सुमारे ६५ किमीचे भाडे आकारल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली. त्यातून मुख्य सूत्रधाराचा थांगपत्ता पोलिसांना लागला.

या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली असून यातील मुख्य सूत्रधाराने सुमारे ५०हून अधिक ओला चालकांना हे अ‍ॅप प्रत्येकी तीन ते चार हजार रुपयांना विकले आहे, अशी माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक विनायक मेर यांनी दिली.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.