सुहास जोशी, मुंबई

आरे दुग्धवसाहतीच्या स्थापनेच्या वेळी तब्बल ३१६२ एकर असलेली जागा सध्या केवळ १८७४ एकर इतकीच उरली आहे. सध्या आरेच्या ताब्यात असलेली जागा ही पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील म्हणून घोषित केलेली असून भविष्यात आरेमध्ये येऊ घातलेल्या अनेक प्रकल्पांनंतर आरेचं अस्तित्व किती उरणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आरे दुग्धवसाहतीसाठी १९४९ मध्ये ३१६२ एकर जागा संपादित करण्यात आली होती. यापैकी काही जागेत आदिवासींचे २७ पाडे, डेअरी, गोठे यांचा समावेश होता. कालांतराने केंद्र व राज्य सरकारच्या विविध प्रकल्पांसाठी, संस्थांना यापैकी १२८७ एकर जागा हस्तांतरित करण्यात आली. त्यामध्ये चित्रनगरी, महानंदा, राज्य राखीव पोलीस दल, फोर्स वन, पशुवैद्यकीय महाविद्यालय, मॉडर्न बेकरी यांचा समावेश होतो. या जागेवर असणारे आदिवासींचे नऊ पाडेदेखील याच आस्थापनांच्या जमिनीवर आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या आरे दुग्धवसाहतीच्या अख्यत्यारित १८७४ एकर इतकीच जागा शिल्लक राहिली आहे. ही जागा ५ डिसेंबर २०१६ च्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या अध्यादेशानुसार पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली.

त्यामुळे या जागेवर कोणतेही बांधकाम अथवा अन्य विकासकाम करता येत नाही. सध्या या १८७४ एकरमध्ये आरे डेअरी, आरे वसाहत, आरे कॅम्पस, १८ आदिवासी पाडे आणि अतिक्रमित झोपडपट्टी आहे. महत्त्वाचे म्हणजे ही अतिक्रमणे किती आहेत याची नोंद आरे दुग्धवसाहतीच्या यंत्रणेकडे नाही. त्याचबरोबर १८७४ एकरमधील एकूण किती जागा बांधाकामाव्यतिरिक्त शिल्लक आहे याची नोंद नसल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने आरेमधील संवेदनशील जागा जाहीर करताना त्यातून ‘मेट्रो ३’च्या कारशेडची जागा वगळली आहे.

येणाऱ्या काळात आरेमध्ये मेट्रो तसेच इतर काही प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांसाठी जागा हवी असेल तर ती नगर नियोजन विभागाकडून बृहन्मुंबई विकास आराखडय़ात बदल करून, ना विकास क्षेत्र आणि हरितपट्टय़ातून वगळावी लागेल.

सर्व मेट्रो मार्गाचे संचालन करणारे मेट्रो भवन गोरेगावजवळील मौजे पहाडी येथे प्रस्तावित आहे. त्या जागेबाबत विकास आराखडय़ात योग्य तो बदल करून नगर नियोजन विभागाने त्याबद्दल आक्षेप मागवले आहेत. भविष्यात प्राणी संग्रहालय सुमारे २४० एकर, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प सुमारे ९० एकर, प्रादेशिक परिवहन कार्यालय, वीज उपकेंद्र, मेट्रो ६, मेट्रो भवन सुमारे पाच एकर, मेट्रो कामगार वसाहत यासाठी जागा हस्तांतरित करावी लागणार आहे.

काँक्रीटीकरणाचे कोणतेही प्रकल्प आरेमध्ये नको

‘आरेत सध्या अस्तित्वात असलेल्या जागेवर असा वेगवेगळ्या प्रकारे डल्ला मारला जात असल्यामुळे भविष्यात या ठिकाणी पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील जागा किती शिल्लक राहणार?’ असा प्रश्न आरे संवर्धन संस्थेच्या अम्रिता भट्टाचार्य यांनी उपस्थित केला आहे. आरेची सर्व जागा आहे त्याच परिस्थितीत ठेवायला हवी, काँक्रीटीकरणाचे कोणतेही प्रकल्प आरेमध्ये येऊ नयेत ही सजग नागरिक म्हणून आमची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.