लोकलमधील अपंगांच्या डब्यात घुसखोरी करणाऱ्या प्रवाशांवर एक लाख रुपये दंड आकारण्याच्या निर्णयाचे अपंग प्रवाशांकडून स्वागत करण्यात येत असले तरी रेल्वे प्रवासी संघटनांमध्ये मात्र या निर्णयाविरोधात नाराजीचा सूर उमटला आहे. दंडाची रक्कम चुकीची असून सुरू केलेल्या कारवाईवर रेल्वे प्रशासन आणि लोहमार्ग पोलिसांनी पुनर्विचार करण्याची मागणी केली जात आहे.

अपंगांच्या राखीव डब्यात सामान्य प्रवाशांकडून मोठय़ा प्रमाणात घुसखोरी होते. त्यामुळे अपंग प्रवाशांना त्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. अशा प्रवाशांवर कठोर कारवाईचा बडगा उचलण्यासाठी २०१६ साली आलेल्या राइट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटी अ‍ॅक्ट या नव्या कायद्याचा आधार घेण्याचा निर्णय लोहमार्ग पोलिसांनी घेतला आहे. या कायद्यानुसार अपंगांच्या डब्यात घुसखोरी करणाऱ्या प्रवाशाला एक लाख रुपयांचा दंड किंवा दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते. या निर्णयाविरोधात रेल्वे प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. ठाणे रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी हा दंड चुकीचा असल्याचे सांगितले. हा निर्णय लोहमार्ग पोलिसांनी मागे घेतला पाहिजे. एखादा प्रवासी नकळतपणे अपंगांच्या डब्यात चढला तर त्यालाही पोलीस दंड करू शकतात. अशा प्रवाशाने कितीही खरे सांगितले तरी त्याचे ऐकणार कोण, असा प्रश्न उपस्थित होईल.

Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
Badlapur, electricity power down, citizens, water supply
बदलापुरात वीज, पाण्यावाचून नागरिकांचे हाल; मध्यरात्री वीज गायब, दिवसाही घामांच्या धारात
A decrease in the supply of new houses was recorded in eight metros of the country print news
नवीन घरांच्या पुरवठ्यात घट, यंदा पहिल्या तिमाहीत ६९ हजारांवर; गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के कमी
Inconvenient as Sinnar buses go directly from the flyover without stopping at small villages
नाशिक: लहान गावांच्या थांब्यांना बससेवेची हुलकावणी

उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या उपाध्यक्ष लता अरगडे यांनी लोहमार्ग पोलिसांच्या निर्णयाला विरोध दर्शविला. अपंगांच्या डब्यात प्रवेश करणे हे चुकीचेच आहे आणि त्या व्यक्तीला दंड होणे हेदेखील बरोबर आहे, परंतु त्यासाठी एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारणे कितपत योग्य आहे. गरोदर महिलांना या डब्यात प्रवेश दिला जाणार होता. त्या निर्णयाचा रेल्वेला विसर आहे.

प्रहार रेल्वे अपंग संघटनेच्या महाराष्ट्र महिला अध्यक्ष फातिमा डिसूजा यांनी लोहमार्ग पोलिसांच्या निर्णयाचे स्वागतच केले आहे. अपंगांना घुसखोरी करणाऱ्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो, याची जाणीव अन्य प्रवाशांना का नाही, त्यांच्यावर रेल्वे कायद्यानुसार कारवाई करूनही त्याची भीती राहिलेली नाही. त्यामुळे नवीन कायद्यानुसार लोहमार्ग पोलिसांनी सुरू केलेली कारवाई योग्यच असल्याचे डिसूजा यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते समीर झवेरी यांनीदेखील नवीन कायद्याकडे सुरुवातीला दुर्लक्षच केल्याचे सांगितले. आता त्याची पोलिसांनी केलेली अंमलबजावणी योग्यच असून त्याला कुणीही नाकारू शकत नसल्याचे झवेरी यांनी स्पष्ट केले.