उपनगरीय रेल्वे प्रवासात धूम्रपान करण्यास कायद्याने बंदी असूनही नियमांना तिलांजली देत लोकलच्या डब्यात धूम्रपान करणारयांवर रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई केली. जानेवारी ते नाव्हेंबरदरम्यान एकूण ४२ जणांवर कारवाईचा ‘दंडु’का उगारण्यात आला. यात या झुरकेबहाद्दरांकडून सहा हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
रेल्वेतून प्रवास करताना ज्वलनशील पदार्थ नेण्यास तसेच धूम्रपान करण्यास बंदी असल्याचे लोकलच्या डब्यात एका फलकावर ठकळपणे नमूद केलेले असते. मात्र तरीही या नियमाकडे कानाडोळा करत काही प्रवासी बिनदिक्कतपणे धूम्रपान करतात.
यात उपनगरीय लोकलमधील समान वाहून नेणारया डब्यांमध्ये धूम्रपान करण्याचे प्रकार सर्रासपणे घडतात. रात्रीच्या वेळी प्रवास करणारया प्रवाशांकडून धूम्रपान अधिक प्रमाणात केले जात असल्याचे रेल्वे सुरक्षा दलातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
गेल्या पाच वर्षांत देशभरात रेल्वे गाडय़ांमध्ये आग लागण्याच्या घटना वाढल्या असतानाही केवळ आपली तल्लफ भावण्यासाठी काही मंडळी दरवाजात उभे राहून धूम्रपान करतात. छोटय़ा आगीमुळे अनेक गोष्टी उध्वस्त होऊ शकतात. याचा विचारही या मंडळींना शिवत नसल्याने असे प्रकार सुरू आहेत.
यात प्रवाशांच्या तुलनेत रेल्वे सुरक्षा दलाची संख्याही अपुरी असल्याने या लोकलच्या डब्यात झुरके घेणारयांवर नियंत्रण ठेवणे कठीण होत असल्याचे रेल्वे संघटना सांगत आहेत.
तर रेल्वेत धूम्रपान केल्यास अडीचशे रुपयांचा दंड आकारला जातो, मात्र दंडाची ही रक्कम फारच कमी असल्याने हा प्रकार सर्रास होतो.
दंड वाढवून किंवा पोलिसांचा फौजफाटा वाढवून उपयोग नाही. धूम्रपान करणारया प्रवाशांनी स्वत:हून आपली जबाबदारी ओळखून लोकलमध्ये व स्थानक परिसरात धूम्रपान करू नये असे आवाहन रेल्वे सुरक्षा दलातील एका वरिष्ठ अधिकारयाने केले. याशिवाय सततच्या कारवाईमुळे धूम्रपान करणारयाचे प्रमाण कमी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.