असह्य उकाडा आणि पाच पावल चालल्यानंतरही घामाच्या धारांनी भिजून निघणाऱ्या नागरिकांना मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिला आहे. मुंबईत ढगाळ वातावरण तयार झाले असून शेजारच्या ठाणे, डोंबिवलीत मुसळधार पाऊस कोसळत आहे. पहिल्या पावसामुळे मातीला सुगंध सुटला असून वातावरणात एक आल्हाददायक गारवा निर्माण झाला आहे.

आज कोकण, नाशिकमध्येही जलधारा बरसल्या. महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस कोसळत असून येथील प्रसिद्ध वेण्णा लेकही ओसंडून वाहू लागला आहे. मागच्या दोन तासांपासून येथे मुसळधार पाऊस कोसळत आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून सात जूनपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होईल असा वेधशाळेचा अंदाज आहे.

स्कायमेटच्या माहितीनुसार शुक्रवारी पुण्यात २५.३ मिमि, नांदेडमध्ये २१ मिमि, वेंगुर्ला ३०.४ मिमि, सांगली २८.५ मिमि पावसाची नोंद झाली.