परतीच्या पावसाचं राज्यात धुमशान सुरू आहे. मागील दोन तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून, पुण्यात तर कहर झाला आहे. पुण्यात बुधवारी रात्री मुसळधार पावसानं अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून, आज मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अतितीव्र कमी दाबाच्या पट्यानं मंगळवारी सकाळी आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलांडली. हे क्षेत्र पश्चिम दिशेला सरकत असून, १४ आणि १५ तारखेला महाराष्ट्रावरून त्याचा प्रवास सुरू होईल, असं हवामान विभागानं म्हटलं होतं. त्यानुसार १४ ऑक्टोबरपासून राज्यात पावसानं जोर धरला असून, राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला आहे.

मुंबईत रेड अलर्ट

कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्राच्या दिशेनं सरकत असून, मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकण भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला. अति मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात मुसळधार, शेतमालाचं नुकसान

राज्यात दोन दिवसांपासून परतीच्या पावसानं जोर धरला असून, राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही पावसाची संततधार कायम आहे. परतीच्या पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरले असून, राज्यात काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी-नाल्याचं पाणी शेतांमध्ये शिरल्यानं अनेक ठिकाणी पिकांचं प्रचंड नुकसान झालं असून, शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. १६ तारखेच्या सकाळी कमी दाबाच्या क्षेत्राचे अवशेष उत्तर कोकण आणि गुजरात किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

पुण्याला झोडपलं… नागरिकांची तारांबळ

पुणे शहर आणि जिल्ह्यायास काल दुपारपासून पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. या जोरदार पावसामुळे अनेक सोसायट्यांमध्ये, तर पुणे शहरातील चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये पाणी शिरल्याची घटना घडली आहे. आणखी दोन दिवस असाच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेध शाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.