बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याची ‘तांडव’ ही वेब सीरिज सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या सीरिजमध्ये हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याचं म्हटलं जात असून ही सीरिज बॉयकॉट करण्याची मागणी सोशल मीडियावर होत आहे. यामध्येच आता भाजपा आमदार राम कदम यांनीदेखील ‘तांडव’वर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे.

“चित्रपट किंवा वेब सीरिजच्या माध्यमातून कायम हिंदू देव-देवतांचा अपमान का केला जातो. अलिकडचंच उदाहरण घ्यायचं झालं तर नवीन वेब सीरिज तांडव. सैफ अली खान पुन्हा एकदा अशाच चित्रपट, सीरिजचा भाग झाला आहे, ज्यातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी सीरिजमधून ते दृश्य हटवले पाहिजेत”, असं ट्विट राम कदम म्हणाले आहेत. या ट्विटसोबत राम कदम यांनी आणखी एक ट्विट केलं आहे.

“हिंदू देवता भगवान शंकर. अभिनेता जीशान अय्यूबने जाहीरपणे माफी मागावी आणि जोपर्यंत या सीरिजमध्ये योग्य ते बदल करण्यात येत नाही तोपर्यंत ‘तांडव’वर बहिष्कार टाका”, असं ट्विट राम कदम यांनी केलं आहे. ‘तांडव’च्या पहिल्याच एपिसोडमध्ये भगवान शंकर आणि श्रीराम या हिंदू देव-देवतांची अवमान करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. त्यानंतर सोशल मीडियावर #BoycottBollywood आणि #BoycottTandav हे दोन हॅशटॅग ट्रेण्ड होत आहेत.

वाचा : सोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफरद्वारा निर्मित ‘तांडव’ ही सीरिज ९ भागांची आहे. त्यात सैफ अली खानसोबत डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशू धुलिया, डीनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तूर, मोहम्मद झीशान अय्यूब, कृतिका कामरा, सारा जेन डायस, संध्या मृदुल, अनूप सोनी, हितेन तेजवानी, परेश पाहुजा आणि शोनाली नागराणी हे कलाकार आहेत.