वर्सोवा- घाटकोपर मेट्रोचे तिकीटदर पुढील महिन्यांपासून १० ते ४० रुपये करण्याचा निर्णय हा प्रकल्प खर्चाच्या आधारे आणि तज्ज्ञांनी केलेल्या शिफारशीनुसारच करण्यात आलेला असल्याचा दावा ‘रिलायन्स इन्फ्रा’ने प्रतिज्ञापत्राद्वारे शुक्रवारी उच्च न्यायालयात केला. दरम्यान, प्रतिज्ञापत्र सुनावणीच्या वेळेसच देण्यात आल्याने ते वाचून त्यावर उत्तर दाखल करण्यासाठी वेळ देण्याची मागणी एमएमआरडीएच्या वतीने करण्यात आली. न्यायालयानेही त्यांची मागणी मान्य करीत प्रकरणाची सुनावणी १९ जून रोजी ठेवली आहे. मेट्रोच्या उद्घाटनापूर्वीच तिकीट दरासंबंधीचा वाद उफाळून आल्याने एमएमआरडीने दरवाढीविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच प्रकरणी लवाद नेमण्याची मागणी केली आहे. न्यायमूर्ती रमेश धानुका यांच्यासमोर त्यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी रिलायन्स इन्फ्रातर्फे प्रतिज्ञापत्र सादर करून तिकीट दरवाढ ही प्रकल्प खर्च आणि तज्ज्ञांनी केलेल्या शिफारशीनुसारच करण्यात आल्याचे न्यायालयाला सांगितले. शिवाय आता पहिल्या महिनाभरासाठी १० रुपयांच्या सवलतीच्या दराने तिकीट आकारण्यात येणार आहे.
त्यानंतर १० रुपये, २० रुपये, ३० रुपये आणि ४० रुपये असे टप्प्यानुसार तिकीट दर असतील असेही कंपनीतर्फे सांगण्यात आले. हे दर स्थानके आणि अंतरानुसार ठरविण्यात आले आहेत, असेही सांगण्यात आले.