तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पुनर्रोपणाचे काम; एका झाडामागे १० हजार रुपये खर्च

मुंबई : उन्मळून पडलेल्या वृक्षांचे ओंडके  कापून त्याची विल्हेवाट लावण्यापेक्षा त्यांचे पुनर्रोपण करून जुनेच वठलेले वृक्ष जगवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ‘तौक्ते’ चक्रीवादळात उन्मळून पडलेल्या गोरेगाव येथील चार वृक्षांना पुन्हा नवे आयुष्य देण्यात आले.

गुजरातकडे निघालेल्या चक्रीवादळाने गेल्या आठवडय़ात मुंबईत धुमाकूळ घातला. वादळी वारा, मुसळधार पाऊस यामुळे मुंबईतील आठशेहून अधिक झाडे उन्मळून पडली. रस्ते, घरे, गृहसंस्थांच्या आवारात पडलेल्या या झाडांमुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याने पालिकेने झाडे हटवण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले. उन्मळून पडलेल्या झाडांचे तुकडे करून त्यांना हटवण्यात आले.

आरे परिसरातही अनेक वृक्ष उन्मळून पडले. या झाडांचे ओंडके  कापून त्यांना हटवण्यापेक्षा जगवण्याचा प्रयत्न ‘रिवायडिंग आरे’ या संस्थेचे कार्यकर्ते करत आहेत. पुनरेपणाची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले. त्यासाठी लागणारे साहित्य, यंत्रे आणि आर्थिक गणिते जमवून निधी उभा करण्यात आला. आंबा, पिंपळ, आकाशनिंब (मिलिंगटोनिया) अशा झाडांचे पुनरेपण करण्यात आले आहे.

पुनर्रोपण कसे झाले!

झाडांची गरज, गुणधर्म लक्षात घेऊन जेसीबीच्या साहाय्याने मोठे खड्डे खणण्यात आले. झाडाने तग धरावा यासाठी त्यांना प्रमाणात छाटून क्रेनच्या साहाय्याने उचलून त्यांचे खड्डय़ात रोपण करण्यात आले. हे करताना झाडांचे नुकसान होणार नाही, साल निघणार नाही, मुळांना हानी पोहोचणार नाही याची खात्री करून आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उन्मळून पडलेल्या वृक्षांचे ओंडके  कापून त्याची विल्हेवाट लावण्यापेक्षा त्यांचे पुनर्रोपण करून जुनेच वठलेले वृक्ष जगवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पुनर्रोपण करण्यात आले. यासाठी एका झाडामागे १० हजार रुपये खर्च आल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली.

झाडे उन्मळण्याची कारणे

मुंबईतील झाडांभोवती मोठय़ा प्रमाणात बांधकाम केले जाते. कधी पालिकेकडून तर कधी गृहसंस्थांकडून झाडाभोवती किंवा आसपासच्या भागात फरशा, टाइल्स, सिमेंटचे बांधकाम केल्याने मुळांची वाढ थांबते. परिणामी मुळे कमकुवत होतात आणि झाडांचा आधार निघून जातो. काहीवेळा झाडाच्या गुणधर्माच्या साजेशा नसलेल्या ठिकाणी लागवड झाल्याने ती उन्मळून पडतात.

बांधकामापूर्वी नागरिकांनी विचार करायला हवा, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. 

नागरिकांचा पुढाकार महत्त्वाचा

‘झाडे पडल्यानंतर नागरिकांची गैरसोय झाल्याने झाडांची विल्हेवाट लावण्यासाठी ते पाठपुरावा सुरू करतात. झाडांचे महत्त्व लक्षात घेऊन धीर धरायला हवा. उन्मळून पडलेली झाडेही जगवता येतात हे अनेकांना ठाऊक नव्हते. पण गोरेगाव येथील झाड पुनर्रोपणाची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित होताच अनेक पर्यावरणप्रेमींनी पुढकार घेतला. त्यानंतर वरळी येथे सहा झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले. तसेच वांद्रे येथून काही गृहसंस्थांनी याची माहिती घेतली,’ असे संस्थेचे संजीव वल्सन यांनी सांगितले.