प्रमुख पिकांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम

मुंबई : महाराष्ट्रात २०५० पर्यंत वार्षिक सरासरी तापमानात ०.५ ते २.५ अंश सेल्सिअस अशी लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असून विशेषत: २०३३ नंतर तापमानातील वाढ प्रकर्षांने जाणवणार आहे. याचा परिणाम ज्वारी, बाजरी, ऊस, गहू, तांदूळ अशा राज्यांतील प्रमुख पिकांच्या उत्पादनावर होणार असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे.

जानेवारी २०१९ मध्ये ‘प्युअर अ‍ॅण्ड अप्लाइड जिओफिजिक्स’ नियतकालिकात प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार २०३३ नंतर महाराष्ट्रात लक्षणीय तापमानवाढ अपेक्षित आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत १ ते २.५ अंश सेल्सिअस तापमानवाढीची शक्यता आहे. पुढील पाच दशकांमध्ये जवळपास ८०% जिल्ह्य़ांमध्ये वार्षिक सरासरी तापमान, वार्षिक किमान तापमान आणि वार्षिक कमाल तापमान यांमध्ये लक्षणीय बदल होणार आहेत. याचा प्रतिकू ल परिणाम ज्वारी, बाजरी आणि कडधान्य यांसारख्या पारंपरिक पिकांबरोबरच ऊस, कांदा, मका यांसारख्या नगदी पिकांच्या उत्पादकतेवर होणार आहे. बारामती येथील विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. राहुल तोडमल यांनी हे संशोधन केले आहे.

प्रामुख्याने हिवाळ्यात होणारी सरासरी तापमानाची वाढ गव्हासारख्या पिकाच्या उत्पादकतेसाठी मारक ठरणार आहे. तसेच भविष्यातील उन्हाळे अधिक तीव्र असतील आणि हिवाळ्यातील थंडी कमी होईल.

प्रा. तोडमल यांनी पुण्यातील आयआयटीएम संस्थेकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीचे संख्याशास्त्रीय विश्लेषण के ले आहे. यानुसार कोकण व विदर्भात २०५० पर्यंत मोसमी पर्जन्यमानात सुमारे १८ ते २२ टक्क्यांची वाढ होऊ शकते.