राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात २०१६-१७ मध्ये आपण भाजपचे खासदार असताना आपले फोन टॅपिंग करण्यात आले होते, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी केला. या कालावधीत माझ्यासह अनेक नेत्यांचे फोन टॅपिंग झाल्याची माहिती मिळते, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपाच्या आमदार-खासदारांना सल्ला दिला.

रोहित पवार म्हणाले, “मागील सरकारने विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप केलेचं. पण ज्येष्ठ नेते असलेले आपल्याच पक्षाचे तत्कालीन खासदार नाना पटोले यांचेही फोन टॅप केल्याच्या वृत्ताने धक्का बसला. हा विश्वास व व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आहे. यातून भाजपच्या आमदार-खासदारांनीही स्वतःहून बोध घ्यायला हवा!”

काय म्हणाले होते नाना पटोले?

फडणवीस सरकारच्या काळात माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेनेतील काही महत्त्वाचे नेते आणि काही आयएएस, आयपीएस अधिकारी यांचे फोन टॅपिंग केले जात होते. माझा संबंध अमली पदार्थांच्या तस्करीशी जोडण्याचा निंदनीय प्रकार करण्यात आला आहे. अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याच्या नावाखाली राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आले. या प्रकरणी माझा नंबर आणि अमजद खान असे खोटे नाव वापरण्यात आले होते. या फोन टॅपिंगशी संबंधित सर्वांची महाविकास आघाडी सरकारने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

फोन टॅपिंग करताना नावे व पत्ते खोटे दाखवून फोन टॅप करण्यात आले. हे फोन टॅपिंग कोणी केले आणि त्यांना परवानगी कोणी दिली, त्याचा उद्देश काय होता, या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत, असे पटोले यांनी म्हटले आहे.