डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा वाद सुरूच असून स्वत:ला अध्यक्ष म्हणून घोषित करणाऱ्या रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्यावर कारवाई करण्यासाठी सोमवारी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यांच्याविरोधात पुन्हा पोलिसांकडे तक्रार करण्यात आली
आनंदराज आंबेडकर यांनी २४ जूनला संस्थेचा सर्व कारभार आपल्या हाती घेतला आहे. संस्थेच्या बहुसंख्य सदस्यांचा आपल्याला पाठिंबा आहे, असा त्यांचा दावा आहे. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी त्याला तीव्र आक्षेप घेतला आहे.
इतकेच नव्हे तर त्यांनी आनंदराज यांनी संस्थेत घुसखोरी केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी गृहमंत्री आर. आर.पाटील यांच्याकडे केली होती. तरीही पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत, असा आरोप करीत मुंबई आरपीआयचे अध्यक्ष गौतम सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली  निदर्शने करण्यात आली. त्यानंतर आरपीआयच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, सहआयुक्त सदानंद दाते व हेमंत नगराळे यांची भेट घेऊन आनंदराज व त्यांच्या सहकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्याचे सोनावणे यांनी सांगितले.