प्रवेशाला शिक्षण संस्थांची बगल; पालकांच्या पदरी निराशा

मुंबई : शिक्षण हक्क कायद्यनुसार राखीव जागांतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी हजारो पालक उत्सुक असताना प्रत्यक्षात पालकांच्या पदरी निराशा येणार आहे. पूर्वप्राथमिक वर्गासाठी पालकांचे प्राधान्य असताना पूर्वप्राथमिकच्या अवघ्या ६०० जागा उपलब्ध आहेत.

शिक्षण हक्क कायद्यनुसार वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यर्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या जागांची प्रवेशप्रक्रिया दरवर्षी शिक्षण विभाग करतो. गेल्या काही वर्षांपासून पूर्वप्राथमिकलाच प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल आहे. मात्र पूर्व प्राथमिक शिक्षण हा शैक्षणिक हक्क म्हणून मान्य करण्याचे धोरण देशपातळीवर चर्चेत असताना मुंबई शहर आणि उपनगरात मात्र पूर्वप्राथमिकच्या नगण्य जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे पालकांच्या पदरी निराशाच येणार आहे.

शाळांना पूर्वप्राथमिक वर्ग संलग्न आहेत, त्या शाळांत पूर्वप्राथमिक हा प्रवेश स्तर असेल तर जिथे पूर्वप्राथमिक संलग्न नाही तिथे पहिली हा प्रवेश स्तर असेल असा निर्णय न्यायालयाने दिला होता. त्यानंतर शासनाने प्रवेश कोणत्या इयत्तेपासून द्यावेत त्याची मुभा शाळांना दिली. शाळांनी मात्र त्याचा गैरफायदा घेत पळवाट काढल्याचे दिसत आहे. मुंबई आणि उपनगरात एकूण ३६७ शाळांपैकी ७ हजार २०२ जागा उपलब्ध आहेत. त्यातील अवघ्या ६५० जागा पूर्वप्राथमिकसाठी आहेत, तर ६ हजार ५५२ जागा पहिलीच्या आहेत. पूर्वप्राथमिकच्या जागाच उपलब्ध नसल्यामुळे यंदाही हजारो अर्ज आले तरी मोठय़ा प्रमाणावर जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे गेले वर्षभर राखीव जागांतर्गत प्रवेश मिळण्याच्या आशेने दुसरीकडे प्रवेश न घेतलेल्या पालकांची अडचण होणार आहे.