News Flash

‘आरटीओ’तून दलालांना हद्दपार करण्याचे आदेश

राज्याच्या परिवहन विभागाचे आयुक्त महेश झगडे यांनी गुरूवारी परिवहन विभागातील दलालांना हद्दपार करण्याचे आदेश दिले.

| January 15, 2015 01:25 am

राज्याच्या परिवहन विभागाचे आयुक्त महेश झगडे यांनी गुरूवारी परिवहन विभागातील दलालांना हद्दपार करण्याचे आदेश दिले. राज्यभरातील परिवहन विभागाच्या (आरटीओ )  सर्व अधिकाऱ्यांना आयुक्तांकडून येत्या १९ तारखेपर्यंत सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या परिसरातील दलालांना हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परिवहन विभागातील दलालांचा सुळसुळाट हा सामान्यांना नवीन नाही. दलालांचा संपूर्ण वेढा पडलेल्या परिवहन विभागात दलालांच्या संगनमताशिवाय एकही काम पुढे सरकत नसल्याचा अनुभव सर्वसामान्यांना येताना दिसतो. क्षुल्लक कारणासाठीही परिवहन विभागात अनेक खेटे मारण्याची वेळ नागरिकांवर येते. त्यामुळे वाहन चालविण्याचा परवाना काढणे किंवा नुतनीकरणासाठी दलालांची मदत ही अनिवार्य ठरते. मात्र, परिवहन आयुक्तांच्या आदेशामुळे दलालांचा अडसर दूर होऊन ही परिस्थिती बदलण्याची आशा आहे. आता दलालांची लॉबी आयुक्तांच्या या निर्णयाला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
यापूर्वी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे आयुक्त असतानाही सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टर आणि केमिस्ट लॉबीवर कायद्याचा बडगा उगारणाऱ्या महेश झगडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. हा निर्णय घेताना मुख्यमंत्री केमिस्ट लॉबीच्या दबावापुढे झुकल्याची चर्चा त्यावेळी मंत्रालयात रंगली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2015 1:25 am

Web Title: rto commissioner mahesh zagade give orders to remove agents from rto area
Next Stories
1 ‘ग्रामविकास’च्या परिषदेचा खर्च ‘युनिसेफ’चा
2 रघुलीला मॉलमध्ये देखभाल खर्चावरून वाद
3 मुंबईतील किमान तापमान १३.७ अंश
Just Now!
X