नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई-ठाण्यातील धावपटूंचे नऊ दिवस लांब पल्लयाचे अंतर धावण्याचे लक्ष्य

मानसी जोशी, लोकसत्ता

मुंबई : करोनामुळे यंदा महत्त्वाच्या मॅरेथॉन स्पर्धा रद्द झाल्याने नवरात्रोत्सवाचे निमित्त साधत मुंबई-ठाण्यातील अनेक धावपटूंनी नऊ दिवस दररोज लांब पल्लयाचे अंतर धावण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ‘नवरन’ या उपक्रमाद्वारे करोना काळात निरोगी जीवनशैली, व्यायामाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी धावपटूंनी हा उपक्रम सुरू केला आहे.

वर्षभरात कांचनजुंगा, हिमालयान मॅरेथॉन, अहमदाबाद, कोची, कोलकाता, ठाणे, नवी मुंबई आणि वसई विरार येथे होणाऱ्या लांब पल्लयांच्या मॅरेथॉनसाठी धावपटू वर्षभर कसून सराव करतात. मात्र, यंदा डिसेंबपर्यंत सर्व स्पर्धा रद्द आहेत. त्यामुळे मुंबई-ठाण्याचे धावपटू नऊ दिवस शहराजवळच्या परिरसरात धावणार आहेत.

नवी मुंबईचे ज्येष्ठ धावपटू हरिदासन नायर दरदिवशी १२ किलोमीटर असे नऊ दिवस एकुण १०८ किमी धावणार आहेत. ते म्हणाले, ‘यंदा आम्ही १०८ सूर्यनमस्कार या संकल्पनेप्रमाणे नऊ दिवसात १०८ किमी धावण्याचा विचार केला. माझ्यासोबत ९० सहकारी दररोज १२ किलोमीटर अंतर धावतील.

शासनाचे नियम पाळून हा उपक्रम आयोजित केला आहे.’ एक दिवस नवी मुंबईतील पामबीच रस्ता तर दुसऱ्या दिवशी ठाण्यातील हिरानंदानी मेडोज येथून धावण्यास सुरुवात होईल. उत्कृष्ट धावपटूस पुरस्काराने गौरवण्यात येईल. कोणत्याही दुखापतीशिवाय १२ किमी अंतर धावणे हे मुख्य लक्ष्य असेल’, असेही त्यांनी लोकसत्ताशी बोलताना स्पष्ट केले.

यंदा अंबरनाथच्या भारती साकिलीयर यांनी बंगळुरू, मुंबई, दिल्ली आणि कोलकाता या चार मॅरेथॉनसाठी नोंदणी केली होती. करोनामुळे त्या रद्द झाल्या. त्यामुळे भारती यांनी नऊ दिवस लांब पल्ल्याचे अंतर धावण्याचा निश्चय केला आहे. तर, ‘करोना काळात व्यायाम आणि निरोगी आहारशैलीचे महत्त्व पटवून देणे हा उपक्रमाचा हेतू आहे.

दिवसातून कमीत कमी चार लिटर, कबरेदके आणि प्रथिनांचे सेवन करत आहोत. पुरेशी झोप, संतुलित आहार आणि रोजचा सराव यावर भर आहे,’ अशी माहिती धावपटू सागर जोशी यांनी दिली.

बदलापूरमधील ‘पेसिंग पँथर’ या धावपटू समूहाने पहिल्या दिवशी एक किलोमीटर तर दुसऱ्या दिवशी दोन किलोमीटर या क्रमाने नवव्या दिवस नऊ किलोमीटर धावण्याचे लक्ष समोर ठेवले आहे. समूहातील प्रत्येक सदस्यांचा धावण्याचा वेगवेगळा आहे. तरी वेळ आणि वेग यांचा विचार न करता अंतर पूर्ण करण्याचा निश्चय धावपटूंनी केला आहे. यासाठी आठवडय़ातील तीन दिवस धावणे आणि तीन दिवस व्यायाम अशी तयारी करत असल्याचे समूहाचे प्रमुख मृणाल सेन यांनी सांगितले. ठाण्यातील रवी उईके हा दररोज २५ किलोमीटर सायकल चालवणार आहे. तो साधारण २० किलोमीटपर्यंत सायकल चालवण्याचा सराव करतो.

आरोग्याकरिता हानीकारक?

नऊ दिवस धावणे हे आरोग्यासाठी हानीकारक असल्याचाही एक मतप्रवाह आहे. मात्र, योग्य आहार आणि धावण्याचा नियमित सराव या दोन्ही गोष्टीत सातत्य राखल्यास धावताना कोणतीही अडचण येणार नाही, अशी प्रतिक्रिया डॉ. नंदकिशोर अहिरे यांनी दिली. नवरात्रीनिमित्त काही महिला आणि पुरुष नऊ दिवस उपवास करतात. अशा वेळी फळे, उपवासाचे पदार्थ यांचे सेवन करणे गरजेचे आहे. योग्य आहार नसल्यास भोवळ येण्याची शक्यता आहे. म्हणून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे अहिरे यांनी सांगितले.