परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यात दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या लेटरबॉम्बमुळे खळबळ उडाली आहे. अँटिलिया बॉम्ब प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात चौकशी सुरू असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी एनआयएला एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव घेत अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, महाविकासआघाडी सरकारमध्ये परिवहन मंत्री असलेले शिवसेनेचे आमदार अनिल परब यांच्यावर देखील त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवरून आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी आपल्याच शैलीमध्ये परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे सचिन वाझे यांच्या पत्रानंतर राजकीय वर्तुळातील वाद चांगलाच तापण्याची चिन्ह दिसत आहेत.

“पुरावे तयार आहेत…”

भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्वीटरवरून अनिल परब यांना लक्ष्य केलं आहे. “ओ परिवार मंत्री… शपथ काय घेता… शेंबूड पुसा.. राजीनामा द्या आणि चौकशीला सामोरे जा… पुरावे तयार आहेत.. आता वस्त्रहरण अटळ आहे”, असं नितेश राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे भाजपानं या मुद्द्यावरून शिवसेनेला घेरण्याची पूर्ण तयारी केल्याचं दिसून येत आहे.

 

“खाल्ल्या मिठाला जागण्याचा प्रकार”

दरम्यान, नितेश राणे यांच्याप्रमाणेच भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी देखील सचिन वाझेंच्या पत्रावरून अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. “अच्छा, म्हणजे सचिन वाझेची विधानसभेत करण्यात आलेली वकिली हा खाल्ल्या मिठाला जागण्याचा प्रकार होता तर…आजकाल इतका प्रामाणिकपणा कुठे पाहायला मिळतो??”, असं ट्वीट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

 

“मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो…” सचिन वाझेंच्या आरोपांवर अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत मांडली भूमिका!

काय आहे पत्रात?

सचिन वाझे यांनी एनआयएला पाठवलेल्या पत्रामध्ये शरद पवारांचं नाव घेऊन आरोप केले आहेत. “माझ्या नियुक्तीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. ते आपल्याला हटवू इच्छित होते. त्यांचं मतपरिवर्तन करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती,” असा आरोप सचिन वाझेंनी केला आहे. तसेच, “अनिल परब यांनी देखील मुंबई महानगर पालिकेतील ५० कंत्राटदारांकडून प्रत्येकी २ कोटींची खंडणी वसूल करण्यास सांगितलं होतं”, असं देखील सचिन वाझेंनी पत्रात म्हटलं आहे.

पवारांचं मतपरिवर्तन करण्यासाठी देशमुखांनी मागितली होती २ कोटींची खंडणी; वाझेंचा गौप्यस्फोट

 

दरम्यान, या प्रकरणावरून भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. “आता अनिल परब यांच्या राजीनाम्यासाठी देखील न्यायालयाच्या आदेशांची वाट पाहावी लागणार का?” असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी ट्वीटरवर उद्धव ठाकरेंना टॅग केलं आहे.