अभिनेता सलमान खान याने त्याचा पहिला वाहन परवाना २००४ मध्ये मिळवला. त्यापूर्वी त्याच्याकडे हा परवाना नव्हता, अशी साक्ष अंधेरी येथील आरटीओ अधिकाऱ्याने सोमवारी सत्र न्यायालयात दिली.
मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडून एकाच्या मृत्यूस, तर चौघांच्या दुखापतीस जबाबदार असल्याच्या आरोपाप्रकरणी सलमानवर सध्या सत्र न्यायालयात नव्याने खटला चालविण्यात येत आहे. २००२ सालच्या या अपघाताशी संबंधित खटल्यात सोमवारी अंधेरी येथील आरटीओ अधिकाऱ्याची साक्ष नोंदविण्यात आली. अपघाताच्या वेळेस सलमानकडे वाहन परवाना होता की नाही हे सिद्ध करण्याच्या दृष्टीने सरकारी पक्षाने या आरटीओ अधिकाऱ्याला साक्षीसाठी पाचारण केले आहे. आरटीओ कार्यालयातील नोंदीनुसार सलमानला १७ ऑगस्ट २००४ रोजी वाहन परवाना देण्यात आला.