पादचारीस्नेही पदपथ, पुलाखाली आसनव्यवस्था, वाचनालय, स्केटिंगची व्यवस्था

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : प्रभादेवी, दादर, परळ भागातून जाणारा, कायम वाहतूक आणि पादचाऱ्यांच्या वर्दळीत हरवून जाणारा सेनापती बापट मार्ग कात टाकण्याच्या बेतात आहे. पादचाऱ्यांसाठी पर्यावरणस्नेही पदपथ, वाहतूक कोंडीमुक्त रस्ता आणि पुलाखालील दुर्लक्षित भागाचे सुशोभीकरण करून मुलांसाठी खेळण्याची आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आकर्षक अशी आसनव्यवस्था करण्यात येत आहे. पालिकेने एका बडय़ा कंपनीच्या मदतीने हाती घेतलेल्या या प्रकल्पामुळे सेनापती बापट मार्गाचे रुपडेच बदलून जाणार आहे.

प्रभादेवी, दादर आणि परळ भागातून जाणाऱ्या सेनापती बापट मार्गावर ठिकठिकाणी वारंवार वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. केवळ वाहतुकीसच नव्हे तर पादचाऱ्यांनाही त्याचा फटका बसतो. या मार्गावर दुतर्फा मोठय़ा कंपन्यांची कार्यालये, तसेच मोठय़ा संख्येने निवासी इमारती आहेत. यामुळे या मार्गावर पादचाऱ्यांचा कायम राबता असतो. पुलाखाली गर्दुल्ले, समाजकंटकांचा कायम वावर असतो. तसेच काही भागांत अनधिकृतपणे वाहनतळ चालविण्यात येत आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिकेच्या ‘जी-दक्षिण’ विभागाने आपल्या हद्दीतून जाणाऱ्या सेनापती बापट मार्गाचा कायापालट करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात काकासाहेब गाडगीळ मार्गापासून गावडे चौकापर्यंतच्या सेनापती बापट मार्गावरील ८०० मीटर भागाचा कायापालट करण्यात येत आहे. या टप्प्यातील मार्गावरील दुतर्फा पदपथाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. सुशोभीकरणादरम्यान पादचारीस्नेही पदपथ उभारण्यात येणार आहेत. या भागातून जाणाऱ्या उड्डाणपुलाखाली गर्दुल्ले आणि समाजकंटकांचा वावर वाढला होता. तसेच अनधिकृतपणे वाहनतळ चालविण्यात येत होते. ही बाब लक्षात घेत या प्रकल्पाअंतर्गत पालिकेने पुलाखालच्या भागाचे सुशोभीकरण हाती घेतले आहे. तेथे मुलांसाठी स्केटिंग, बॅडमिंटनची व्यवस्था आणि छोटेखानी वाचनालय  उभारण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आसन व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी तेथे बसता येईल. तसेच छोटेखानी बैठकही घेता येईल. यासाठी पुलाखालील १,७१३ चौरस मीटर जागेचा वापर करण्यात येणार आहे. या पुलाच्या खांबावर विविध रोपांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे हे खांब आकर्षक बनले आहेत.

पादचारीस्नेही पदपथांची निर्मिती करतानाच वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यांवर मार्गिका तयार करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सायकलप्रेमींसाठी तेथे एक सायकल मार्गिकाही असणार आहे. ब्लॅक स्टोन ग्रुप आणि न्यूक्लियस ऑफिस पार्क यांच्या मदतीने पालिका हा प्रकल्प राबवत आहे.

रस्त्याचे सुशोभीकरण

सध्या प्रायोगिक  तत्त्वावर ८०० मीटर लांबीच्या रस्त्याचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर उर्वरित सेनापती बापट मार्गाचा कायापालट करण्यात येणार आहे.

आजघडीला या पदपथावरील क्षेत्र ६,८४४ चौरस मीटर इतके आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ते ९,०७७ चौरस मीटर इतके होणार आहे.

या मार्गावर आजघडीला केवळ १३ वृक्ष आहेत. त्यामुळे या प्रकल्पाअंतर्गत वृक्ष लागवड करण्यात येणार असून भविष्यात येथील वृक्षांची संख्या १४० होईल.

सेनापती बापट मार्गावर कंपन्यांच्या मदतीने पर्यावरण आणि पादचारीस्नेही प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकल्पामुळे नागरिकांना सुविधा मिळणार आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचे अनेक प्रश्न सोडविता येतील. कंपन्यांनी सामाजिक बांधिलकी जपून भविष्यात पालिकेला मदत केल्यास मुंबईचा संयुक्तरीत्या विकास करता येईल.

– शरद उघाडे, साहाय्यक आयुक्त, ‘जी-दक्षिण’

या परिसरातील कार्यालयांमध्ये काम करणारे कर्मचारी, वास्तव्यास असलेले रहिवासी, पादचाऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये पदपथांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. त्याचबरोबर पुलाखालील मोकळ्या जागेत अभिनव अशा सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत.

– कैझर परवेझ, प्रमुख कार्यकारी अधिकारी, न्यूक्लियस ऑफस पार्क