घरातच तिळाचे लाडू बनवण्याकडे कल

मुंबई : करोना संसर्गाच्या भीतीने यंदा तिळाच्या तयार लाडू खरेदीवर संक्रांत आली असून ग्राहकांनी लाडू खरेदीकडे पाठ फिरवली आहे. तर रेल्वे प्रवासावर असलेल्या निर्बंधांमुळे  ‘तिळगूळ’ विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन संक्रांतीच्या मुहूर्तावर पुरेसा ग्राहकवर्ग नसल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजी आहे.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तिळाचे लाडू, साखरदाणे आदी वस्तू घेऊन या विक्रेत्यांनी आपले बाकडे थाटले. परंतु मनासारखा ग्राहकवर्ग मिळत नसल्याने यंदाची संक्रांत त्यांना कडू वाटत आहे. ‘मकर संक्रांत ते रथसप्तमी या कालावधीत साधारण एक हजार किलो लाडू आम्ही विकतो. परंतु यंदा ग्राहकच नसल्याने संक्रांतीसाठी तयार केलेल्या लाडवाची विक्री झालेली नाही. लोकांच्या मनात असलेल्या करोना संसर्गाच्या भीतीचा हा परिणाम आहे.’ असे दादर येथील लाडू विक्रेत्या लक्ष्मी नागवेकर यांनी सांगतले. महिनाभर चालणाऱ्या हळदीकुंकू कार्यक्रमासाठी लाडवांना मोठी मागणी असते. मात्र यंदा लाडू घरीच बनवण्याकडे अनेकांचा कल आहे, असेही त्यांनी सांगितले.

लाडू हाताने वळले जातात. त्यामुळे सुरक्षिततेबाबतची खात्री ग्राहकांना नाही. रेल्वे प्रवासावरील निर्बंधचा फटका विक्रीला बसला आहे, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. ‘मकर संक्रांतीच्या दोन दिवस आधीपासून पुढे आठवडाभर दादर, परळ, लालबाग येथील बाजारपेठांमध्ये आमच्या गाडय़ा लगतात. दादर स्थानकाशेजारीच बाजार असल्याने एरव्ही ग्राहकांची झुंबड उडते. यंदा मात्र दिवसभरात चार-पाच किलोही लाडू विकले जात नाहीत,’ असे विक्रेते दीपक जैस्वर यांनी सागितले. ‘दोनशे रुपये प्रतिकिलोने विकले जाणारे लाडू वीस ते पंचवीस रुपये भाव कमी करून ग्राहक मागतात. माल पडून राहण्यापेक्षा विकलेला बरा, या भावनेने आम्हीही लाडवांची विक्री करीत आहोत. पण यात अगदी किरकोळ नफा मिळतो,’ अशी व्यथा मनोज जैस्वाल याने मांडली.

करोना संसर्गाच्या भीतीने घरी तिळाचे लाडू तयार करण्याकडे लोकांचा कल वाढला. गेल्या वर्षी मकर संक्रांतीला ३५ ते ४० किलो लाडवांची मागणी होती. मात्र यंदा केवळ पाच किलो लाडू विकले गेले आहेत.

– अनिकेत आपटे, दत्तकृपा फूड्स