नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने भाविकांची होणारी गर्दी विचारात घेता ३० ऑगस्टला होणारी प्राध्यापकांकरिता होणारी ‘सेट’ ही पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ‘स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट’चे (सेट) आयोजन ३० ऑगस्टला करण्यात आले होते. मात्र कुंभमेळ्यादरम्यान होणाऱ्या शाही स्नानामुळे परीक्षा केंद्र उपलब्ध नसल्याचे कारण देत ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे परीक्षेचे आयोजक असलेल्या पुणे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. आता ही परीक्षा ६ सप्टेंबरला होणार आहे. सुमारे १८ महिन्यांच्या विलंबाने ही परीक्षा होत होती. त्यात ती आणखी लांबविण्यात आल्याने उमेदवारांमध्ये नाराजी व्यक्त होते आहे.
या आधी नाशिकमधील परीक्षा केंद्र इतरत्र हलविणे शक्य आहे का, याची चाचपणी आयोजकांनी केली. मात्र नाशिकमधील उमेदवारांना बाहेरच्या परीक्षा केंद्रांवर पोहोचणे अडचणीचे होणार असल्याने परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात
सप्टेंबरला कुंभमेळा संपणार असल्याने नाशिकमधील भाविकांची गर्दी कमी होईल असा अंदाज आहे. त्यामुळे, सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.