भीमा-कोरेगाव येथे दरवर्षी लोक येतात. पण आजपर्यंत तिथे कधी संघर्ष झाला नाही. २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त साहजिकच तिथे उपस्थिती जास्त असेल याची प्रशासनालाही कल्पना होती. अशावेळी तिथे योग्य ती काळजी घेण्याची गरज होती. आता या घटनेला कोणताच रंग देऊ नये. प्रकरण वाढवू नये. घडलेला प्रकार चांगला नाही. सर्वांनी शांतता बाळगावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

भीमा-कोरेगाव प्रकरणी आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी आपली भूमिका मांडताना समाजातील सर्व स्तरातील लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, या घटनेविषयी मी वढू गावातील लोकांशी संवाद साधला. पुणे शहरातून आलेल्या हिंदूत्ववादी संघटनांनी येथे येऊन चिथावणी दिल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. बाहेरून आलेले लोक गोंधळ करून गेले. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. पण स्थानिक लोकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्या लोकांचा या घटनेशी काहीएक संबंध नाही. त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे असल्याचे त्यांनी सांगितले.

गावात गेल्या दोन दिवसांपासून गर्दी होती. यावेळी २०० वर्षे पूर्ण होत असल्यामुळे लोकांना येथे येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे गर्दी जास्त होणार याची सर्वांनाच कल्पना होती. दोन दिवसांपासून येथील वातावरणातही अस्वस्थता होती. त्यामुळे योग्य ती दक्षता घेण्याची गरज होती. ती न घेतल्यानेच ही परिस्थिती उद्धवल्याचे पवार म्हणाले.

कालच्या घटनेत नांदेड जिल्ह्यातील एक दलितेतर तरूण मृत्यूमुखी पडला. ही गोष्ट चिघळू नये याची पोलिसांनी योग्य काळजी घेतली, हे चांगले झाले. पोलिसांनी या घटनेच्या तळापर्यंत जावे. राज्य सरकारनेही याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली व पुन्हा एकदा सर्वांनी शांतता राखण्याचे आवाहन केले.