संतोष प्रधान

आतापर्यंत निवडणूक आणि काँग्रेस मुद्यांवर भूमिकेत बदल

‘यापुढे थेट लोकांमधून निवडणूक लढणार नाही’, असे २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर करून राज्यसभेचा मार्ग पत्करलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा लोकांमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यापूर्वी काँग्रेस पक्षात परतणार नाही, असे घोषित करूनही पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. निवडणूक आणि काँग्रेस या दोन मुद्दय़ांवर पवारांनी आतापर्यंत आपल्या भूमिकेत बदल केला आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून पवारांनी आपली उमेदवारी जाहीर केली. यापूर्वी २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी यापुढे थेट लोकांमधून लढणार नाही, असे सांगत पवारांनी थेट निवडणुकीच्या रिंगणातून निवृत्ती पत्करली होती. लोकसभेऐवजी पवारांनी तेव्हा राज्यसभेवर जाणे पसंत केले होते. २०१४ एप्रिलपासून पवार हे राज्यसभेचे खासदार आहेत. २००९ प्रमाणेच आगामी लोकसभा निवडणुकीत पवार माढा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत.

काँग्रेस प्रवेशावरूनही पवारांनी भूमिका बदलली होती. पवार यांना तरुण वयातच काँग्रेस पक्षात आमदारकी आणि महत्त्वाची पदे मिळाली होती. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकांमध्ये देशभर काँग्रेसची धुळधाण उडाली. पण महाराष्ट्रात संघटन काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस या दोन काँग्रेसचे सरकार सत्तेत आले होते. शरद पवारांनी जनता पक्षाच्या मदतीने पुरोगामी लोकशाही आघाडीचा (पुलोद) प्रयोग केला होता. काँग्रेस पक्षात फूट पडून पवारांच्या नेतृत्वाखाली सरकार आले होते. १९८० मध्ये इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या. तेव्हा पवारांच्या नेतृत्वाखालील सरकार बरखास्त करण्यात आले. पवार तेव्हा समाजवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते. पवारांनी पुन्हा काँग्रेसमध्ये यावे म्हणून प्रयत्न झाले होते. तेव्हा ‘हिमालयात जाईन पण काँग्रेसमध्ये परतणार नाही’, असे विधान पवारांनी केले होते. पवारांचे विधान तेव्हा गाजले होते. १९८६ मध्ये राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली पवारांनी पुन्हा स्वगृही म्हणजे काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. १९९९ मध्ये सोनिया गांधी यांच्या विदेशीच्या मुद्दय़ावर पवारांनी पुन्हा काँग्रेसशी फारकत घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करण्याची काँग्रेसची विनंती त्यांनी धुडकावली.

माढा मतदारसंघातून पवार हे २००९च्या निवडणुकीत सुमारे तीन लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. दहा वर्षांनी याच मतदारसंघातून पुन्हा चांगल्या मताधिक्याने निवडून येण्याचे आव्हान पवारांसमोर असेल.

दिल्लीतील घडामोडींमुळेच रिंगणात?

कोणत्याही पक्षाला २७२चा जादुई आकडा गाठणे शक्य झाले नाही आणि १९९६ प्रमाणे परिस्थिती निर्माण झाल्यास आपले नाणे खणखणीत असावे, असा पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा असलेल्या छोटय़ा पक्षांच्या नेत्यांचा प्रयत्न असेल. विरोधकांमध्ये नेतृत्वावरून वाद आहे. अशा वेळी पवारांचे नेतृत्व सर्वमान्य होऊ शकते. सध्या विरोधकांच्या हालचालींचे केंद्रबिंदू हे पवार हेच आहेत. अशा वेळी लोकसभेतून निवडून गेल्यास अधिक फायदेशीर हे गणित डोळ्यासमोर ठेवूनच पवारांनी हा निर्णय घेतला असावा.

पवारांनी निवडणूक लढवावी हा नेत्यांचाच आग्रह होता. त्यांची तयारीच नव्हती. पण आग्रहामुळे ते तयार झाले. ते रिंगणात असल्याने राष्ट्रवादीत उत्साह आहे. त्याचा आघाडीलाच फायदा होईल.

जयंत पाटील,  प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी