राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून जाणाऱ्या नेत्यांविषयी बोलताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका सभेत स्वाभिमानाचा मुद्दा उपस्थित केला होता. याच मुद्यावरून शिवसेनेने पवार यांना लक्ष केलं आहे. “कोणी सोडून गेले त्याची काळजी करू नका. पक्ष सोडून जाणाऱ्यांनी त्यांचा स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे,” असे शरद पवार म्हणतात. हा स्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो पवारसाहेब?,” असा सवाल करत शिवसेनेने पवारांच्या दिशेने बाण सोडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रापासून ते कोकणापर्यंत राष्ट्रवादीला गळती लागली आहे. गेल्या आठवड्यात साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनीही भाजपात प्रवेश केला. त्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना पवार यांनी पक्ष सोडलेल्या नेत्यांवर टीका केली होती. “कोणी सोडून गेले त्याची काळजी करू नका. पक्ष सोडून जाणाऱयांनी त्यांचा स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे,” असे शरद पवार म्हणाले होते. पवारांच्या याच विधानाला शिवसेनेने प्रश्नांकित केले आहे. शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून टीका पवार यांच्यावर टीका केली आहे. “पळपुट्यांना मतदार धडा शिकवतील, असे शरद पवार यांनी सांगितले आहे. पवार यांनी सत्य सांगितले आहे. शिवसेनेतून काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत वेळोवेळी जे लोक गेले त्यांचा त्या त्या वेळी पराभव झाला आहे. छगन भुजबळ हे शिवसेना सोडून गेले तेव्हा त्यांचा माझगावात पराभव झाला. लोकसभा निवडणुकीत नाशिकला त्यांना मतदारांनी धूळ चारली. नारायण राणे यांचा कोकणात पराभव झाला व नवी मुंबईत गणेश नाईक पराभूत झाले. एखादा अपवाद वगळता भुजबळ-राणेंबरोबर गेलेले आमदार पुन्हा विधानसभेत दिसले नाहीत, पण तो इतिहास झाला. आता इतिहास बदलणारे वारे वाहत आहेत. पवार यांनी नव्याने पक्षबांधणीसाठी महाराष्ट्रभर दौरे सुरू केले आहेत. त्यांचा काम करण्याचा झपाटा मोठा आहे. महाराष्ट्रातील मेगा गळतीचा सगळय़ात मोठा फटका पवारांच्या राष्ट्रवादीला बसला आहे. ‘कोणी सोडून गेले त्याची काळजी करू नका. पक्ष सोडून जाणाऱयांनी त्यांचा स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे,’ असे शरद पवार म्हणतात. हा स्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो पवारसाहेब?,” असा प्रश्न उपस्थित करत “स्वतः पवारसाहेबांनी स्वाभिमानाच्या मुद्दय़ावर सोनियांबरोबर वाद केला. काँग्रेस पक्षात बंड केले. आज त्याच सोनियांबरोबर मागील दीड-दोन दशकांपासून त्यांचे राजकीय ‘गुप्तगू’ सुरू आहे. पवारसाहेब, तुम्ही आज ज्यांना पळपुटे म्हणत आहात ते काल कुठून तरी पळून किंवा फुटूनच तुमच्या तंबूत शिरले होते. आता तुमचा तंबूच भुईसपाट झाला. स्वाभिमानाचे नाव का घेता? वळणाचे पाणी वळणाला गेले,” असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

सोय आणि तडजोडीचं राजकारण

सोडून जाणाऱ्या नेत्याविषयी शिवसेनेनं राजकीय सल्ला दिला आहे. “शिवसेना किंवा भाजपातील काही मंडळी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत सामील करून घेतली तेव्हा या मंडळींनी स्वाभिमानाचे कोणते शिखर जिंकले होते? त्यांनी तेव्हाही स्वाभिमान वगैरे शब्दाची ऐशी की तैशीच केली होती. शिवसेना सोडताना त्यांना काही स्वाभिमानाचे अजीर्ण झाले नव्हते व आजही पक्षांतरे करताना स्वाभिमान वगैरेची ढेकर कुणी देत नाहीत. राजकारणात सध्या सोय आणि तडजोड महत्त्वाची मानली जाते,” असे शिवसेनेनं म्हटलं आहे.

पवारांना गंमत वाटणे हीच मोठी गंमत

पवारसाहेबांचे असे सांगणे आहे की, ‘‘मी माझ्या राजकीय कारकीर्दीच्या 52 वर्षांत 27 वर्षे सत्तेबाहेर होतो. सत्तेबाहेर राहून अधिक जोमाने काम केले. आता पक्षांतर करणारे विकासासाठी जात आहेत असे सांगतात तेव्हा गंमत वाटते!’’ पवारांना याबाबत गंमत वाटणे हीच मोठी गंमत आहे,” अशी उपरोधिक टीका शिवसेनेने केली आहे.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena asked to sharad pawar what is self respect bmh
First published on: 17-09-2019 at 07:11 IST