पुढील लोकसभा भाजपच्या भरवशावर लढण्याऐवजी स्वबळावर लढण्याच्या पक्षाच्या निर्णयावर शिवसेना खासदारांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. ‘बरे झाले, एकदाची स्पष्टता आली,’ अशी बहुतांशांची भावना असली तरी जमिनीवरील घडामोडींची कल्पना नसलेल्या राज्यसभेतील मंडळींच्या सांगण्यावरून इतक्या घाईघाईने निर्णय घेण्याची गरज नव्हती, असेही बहुतकांचे म्हणणे आहे. एकंदरीत या निर्णयाने शिवसेनेच्या खासदारांमध्ये चांगलीच चलबिचल झाली.

‘मुंबई- ठाण्यात पक्षाची ताकत आहे. पण विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राबाबत तसे छातीठोकपणे सांगता येणार नाही. सहा सहा विधानसभा मतदारसंघ असलेल्या अवाढव्य लोकसभा मतदारसंघाला भाजपबरोबर नसताना तोंड देणे अवघड जाईल. शिवसेना नसल्याचा भाजपलाही त्रास होईलच. पण आमच्याइतका नाही. लोकसभेला आम्हाला त्यांची जास्त गरज भासते,’ असा विदर्भातील एक खासदार नाव न छापण्याच्या अटीवर म्हणाला. विदर्भात शिवसेनेला फार स्थान नाही. अशा वेळेला भाजपबरोबरील युतीचा भरभक्कम आधार शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांना असतो. पण कदाचित यापुढे तो नसेल. शिवसेनेचे १८पैकी चार खासदार विदर्भातील आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील एका खासदाराच्या मते, ‘इतक्या लवकर निर्णय जाहीर करून भाजपला पूर्ण तयारी करण्यास वेळ दिला गेला. युती अवघडच असल्याचे सर्वानाच माहीत आहे. पण तरीही दोघे लोकसभा एकत्रित लढतील आणि विधानसभा मागीलप्रमाणे स्वतंत्र लढतील, असे अनेकांना वाटत होते.

भाजपमधील अनेकांना तसाच संभ्रम होता. पण आता आम्हीच संभ्रम दूर केल्याने भाजपला स्वतंत्र तयारीला पुरेशा वेळ मिळेल.

आमच्यात युती झाली नाही; पण काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी केल्यास आमचे काय हाल होतील, याची कल्पना करवत नाही.’ हा खासदार पश्चिम महाराष्ट्रातील असल्याने त्याला काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीची जास्त काळजी आहे.

काही खासदार म्हणतात, भाजपला धडा शिकवू!

  • शिवसेनेचे सगळेच खासदार काही नाखूश नाहीत. ‘बरे झाले, एकदाचा निर्णय झाला. नाही तर विनाकारण भिजत घोंगडे पडून होते. आता आम्हालाही तयारीला वेळ मिळेल. आम्हाला त्रास होईल, पण काही ठिकाणी आम्ही भाजपला धडा शिकवू,’ असे मुंबई-ठाणे पट्टय़ातील खासदाराचे म्हणणे पडले.त्यांच्या मतदारसंघात भाजपला फार स्थान नाही. त्याच्या मते, पुढील चार-पाच महिन्यांत शिवसेना राज्य सरकारमधूनही बाहेर पडेल.
  • भाजपची रसद न मिळाल्यास अडचणीत येणारे काही खासदार भाजपच्या गळाला लागल्याची राजधानीतील चर्चा जुनीच आहे. त्याला फारसा दुजोरा कधी मिळत नाही. पण आता पक्षाने ‘एकला चलो रे’चा नारा दिल्याने शिवसेनेच्या काही खासदारांना भाजपची ‘भुरळ’ पडू शकते, असे सांगण्यात येते.