मुंबईला नवी मुंबई आणि उरण, न्हावाशेवा परिसराशी जोडण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या शिवडी ते न्हावाशेवा दरम्यानच्या सागरी सेतूसाठी केंद्र सरकारचे दोन हजार कोटी रुपयांचे वित्तसाह्य मिळण्यासाठीची सर्व प्रक्रिया पार पडली आहे. महिनाभराच्या आत म्हणजेच नवीन वर्षांच्या आरंभीच महाराष्ट्राच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला दोन हजार कोटी रुपये मंजूर होण्याची आशा आहे.
शिवडी ते न्हावाशेवा सागरी सेतूची लांबी सुमारे २२ किलोमीटर असेल. देशविदेशातील नामांकित कंपन्यांनी त्यात रस घेतला आहे. सागरी सेतू प्रकल्पात १६.५ किलोमीटरचा प्रत्यक्ष सागरी सेतू असेल तर ५.५ किलोमीटर लांबीचा मार्ग हा किनारपट्टी भागातून सागरातील सेतूवर आणि तेथून नंतर किनारपट्टीवर पूल संपतो तेथपर्यंत असेल. शिवडीहून पूर्वमुक्त मार्गाला जोडणारा आणि चिर्लेहून राष्ट्रीय महामार्ग ‘चार-बी’ला जोडणारा रस्ताही वाहतूक व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरणार आहे. या सागरी सेतूसाठी ९६३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे २० टक्के निधी व्यवहार्यता तफावत निधी (व्हीजीएफ) म्हणून मिळावा अशी प्राधिकरणाची मागणी होती. त्यानुसार दोन हजार कोटी रुपयांचा निधी देण्याबाबत अर्थ मंत्रालयाच्या समितीने दोन महिन्यांपूर्वीच हिरवा कंदील दाखवला. त्याबाबतची फाईलही आता पूर्ण झाली असून केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची स्वाक्षरीसाठी ती त्यांच्या कार्यालयात पोहोचली आहे. लवकरच त्यावर अर्थमंत्र्यांची स्वाक्षरी होईल. येत्या काही दिवसांत ती होण्याची अपेक्षा असून फार फार तर महिनाभरात नवीन वर्षांत या दोन हजार कोटी रुपयांच्या वित्तीय साह्य मंजुरी मिळेल. एकदा ती औपचारिकता पूर्ण झाली की शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूच्या बांधकामासाठी निविदा मागवण्यात येतील.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 25, 2012 4:38 am