या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गृहखाते शिंदेंकडे, जयंत पाटील यांच्याकडे अर्थ तर महसूल थोरातांकडे

महाविकास आघाडी सरकारच्या सत्तावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत शिवसेना आणि काँग्रेसला ‘वजनदार’ खाती मिळाली आहेत. ताकदवान मानल्या जाणाऱ्या गृहखात्याबरोबरच सर्वाधिक आणि महत्त्वाची खाती आपल्याकडे घेणाऱ्या शिवसेनेचा सरकारवर वरचष्मा दिसतो. महसूल, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, शालेय शिक्षण आदी महत्त्वाची खाती मिळविण्यात काँग्रेस यशस्वी झाली. अर्थ, जलसंपदा, ग्रामविकास ही काही मोजकीच महत्त्वाची खाती राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आली आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या आघाडी सरकारमध्ये खातेवाटपाचा घोळ सुरू होता. अखेर दोन आठवडय़ांनंतर सहा मंत्र्यांचे तात्पुरते खातेवाटप करण्यात आले. शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंकडे गृहखाते, राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांच्याकडे अर्थ तर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्या वाटय़ाला महसूल खाते आले. ज्या पक्षाच्या वाटय़ाला जी खाती येणार आहेत, ती खाती त्या त्या पक्षांच्या मंत्र्यांकडे सध्या सुपूर्द करण्यात आली. सत्तावाटपाच्या सूत्रानुसार शिवसेनेला मुख्यमंत्र्यांसह १५, राष्ट्रवादी काँग्रेसला १६ आणि काँग्रेसला १२ मंत्रिपदे देण्यात आली आहेत. काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद मिळाले आहे, तर राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद देण्याचे ठरले आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानसभा सदस्य संख्येच्या आधारे काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. खातेवाटपात मात्र राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसला वजनदार खाती मिळाली आहेत. यापूर्वी राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना, काँग्रेसकडे मुख्यमंत्रिपद देऊन राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृह, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, अर्थ व नियोजन, ऊर्जा, वैद्यकीय व उच्च शिक्षण, ही महत्त्वाची खाती असायची. शिवसेनेसोबतच्या सत्ता सहभागात मात्र राष्ट्रवादीला गृहखाते सोडावे लागले. अतिशय महत्त्वाचे आणि ताकदवान गृहखाते शिवसेनेने स्वतकडे ठेवले.

राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ व नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, जलसंपदा, ग्रामविकास, इत्यादी खाती मिळाली आहेत. तर काँग्रेसला महसूल, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, महिला व बालविकास, ओबीसी कल्याण, आदिवासी विकास ही महत्त्वाची व वजनदार खाती मिळाली आहेत. या पूर्वी आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्याय हे खाते नेहमी काँग्रेसकडे व आदिवासी विकास हे खाते राष्ट्रवादीकडे असायचे. या वेळी काँग्रेसला आदिवासी विकास व राष्ट्रवादीला सामाजिक न्याय, अशी अदलाबदल करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन खाते

कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेले विभाग मुख्यमंत्र्यांकडे असतील, असे खातेवाटपाच्या यादीत स्पष्ट करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन खाते कोणत्याही मंत्र्याकडे दिलेले नाही. सरकारच्या कारभारावर नियंत्रण ठेवणारे सामान्य प्रशासन हे खाते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:कडेच ठेवले आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री सामान्य प्रशासनबरोबरच गृह, नगरविकास अशी खाती स्वत:कडे ठेवत. ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांच्याप्रमाणे एकच खाते ठेवले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena congress ncp minster sit akp
First published on: 13-12-2019 at 03:14 IST