करोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने लादलेल्या कडक निर्बंधांचा परिणाम सोमवारी, पहिल्या दिवशी संमिश्र होता. रात्री आठनंतरची जमावबंदी नागरिक, व्यावसायिकांनी काटेकोरपणे पाळल्याने शहरातील काही भाग, वस्त्या चिडीचूप होत्या. तर काही भागांत रात्री आठनंतरही दुकाने, फेरिवाल्यांचे व्यवसाय बिनबोभाट सुरू होते. दाट वस्तीच्या झोपडपट्यांमध्ये नव्या निर्बंधांचा विशेषत: जमावबंदीचा परिणाम जाणवला नाही.

२७ मार्चला रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत जमावबंदी जारी करण्यात आली. त्याचे पालन शहरातील काही भागांत काटेकोरपणे सुरू झाले होते. करोना प्रसाराचा वेग वाढल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य मंत्रिमंडळाने सोमवारपासून जमावबंदी कठोरपणे राबवण्याचा निर्णय घेतला. मात्र शहरातील काही भागांतील नागरिकांनी या निर्बंधांना भीक न घातल्याचे चित्र सोमवारी रात्री दिसले. धारावीसह गोवंडीतील शिवाजीनगर, लल्लूभाई कम्पाऊंड, मंडाले, मालवणी अशा दाट वस्तीच्या झोपडपट्यांमधील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. येथील अन्नपदार्थ, फळे विकणारे फे रिवाले, पान टपऱ्यां,विविध वस्तूंची दुकाने रात्री दहापर्यंत ग्राहकांच्या सेवेसाठी खुली होती. विशेष म्हणजे नागरिकही तेथे गर्दी करत होते.

आठनंतर जमावबंदी असली तरी कार्यालयांमधून सुटलेला कर्मचारी, कामगार वर्ग रात्री उशिरापर्यंत उपनगरीय लोकल, बेस्ट बस, रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनांनी आपापल्या घरी परतत होता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर नऊच्या सुमारास प्रवाशांची तुलनेने कमी गर्दी होती. मध्य मार्गावरील सहा फलाटांऐवजी हार्बर मार्गावरून पनवेल, अंधेरीकडे जाणारे प्रवासी फलाट क्रमांक एक व दोनवर अधिक आढळले.

निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी हद्दीत गर्दी होणाऱ्यां प्रत्येक ठिकाणांवर मनुष्यबळ तैनात करणे, गस्त वाढवणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस प्रवक्ते चैतन्य एस. यांनी दिली. तर एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार कठोर निर्बंधांच्या पहिल्या दिवशी गस्त वाढवून, जागोजागी मनुष्यबळ तैनात करून विनाकारण रेंगाळणाऱ्यां, मुदतीबाहेर व्यवसाय सुरू ठेवणाऱ्यांना समज दिली गेली. यापुढे फौजदारी कारवाई के ली जाईल.

जुने पास वैध

पहिल्या टाळेबंदीत वैद्यकीय, अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना शासनाने प्रवासाची परवानगी दिली होती. अशा व्यक्तींना पोलिसांनी पास वितरित के ले होते. यावर्षी एप्रिल महिन्यात जारी करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये वैद्यकीय, अत्यावश्यक सेवांशी संबंधीत व्यक्तींना जुन्या पासआधारे प्रवास करता येईल. पोलीस दलाचे प्रवक्ते चैतन्य एस. यांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या पासची मुदत संपली असली तरी तो वैध गणला जाईल. मात्र ज्यांना नव्याने पास आवश्यक असेल त्यांनी त्या त्या विभागाच्या सहायक आयुक्त(एसीपी) कार्यालयाशी संपर्क साधावा.

गृह अलगीकरणातील रुग्णांवर लक्ष

मुंबई : करोनाचा प्रसार झपाट्याने होत असतानाच रुग्णालयात दाखल होण्याऐवजी गृह अलगीकरणात राहण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे. मात्र, गृह अलगीकरणाचे काटेकोर पालन होत नसल्यामुळे करोनाचा वेगाने प्रसार होत आहे. त्यामुळे चाचण्या वाढविण्यासोबतच संपर्कातील लोकांचा शोध घ्यावा आणि गृहअलगीकरणात असलेल्यांवर लक्ष्य ठेवा, असे आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपरिषदांना दिले.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पाश्र्वाभूमीवर एकनाथ शिंदे यांनी दूरचित्र संवादाच्या माध्यमातून महापालिका आयुक्त, नगर परिषदांचे मुख्याधिकारी, तसेच जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक उपस्थित होते. गृहअलगीकरणात असलेल्या रूग्णांवर लक्ष्य ठेवण्यासाठी  प्रत्येक महापालिकेने कॉल सेंटर्स सुरू करून रुग्णांचा नियमित मागोवा घेण्याचे आदेश  शिंदे यांनी सर्व महापालिका आणि नगरपालिकाना दिले. रुग्णालये, करोना रूग्ण निगा केंद्र येथे कुठल्याही प्रकारची गैरसोय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही शिंदे यांनी दिला. याशिवाय ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर कमी पडणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना केली.