‘एमई’ व ‘एमटेक’ या अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी यंदा प्रथमच होणारी ‘पीजीईटी-सीईटी’ अनेक विद्यापीठांच्या अभियांत्रिकी पदवी परीक्षांच्या (बीई) दरम्यान आल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे.
राज्यात ‘मास्टर ऑफ इंजिनीअरिंग’ (एमई) व ‘मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (एमटेक) सुमारे १५ हजार जागा आहेत. या जागा राष्ट्रीय स्तरावरील ‘गेट’ या प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून भरल्या जातात. पण गेटमधून पुरेसे विद्यार्थी मिळत नसल्याने एमई-एमटेकच्या दरवर्षी सुमारे तीन ते साडेतीन हजार जागा रिक्त राहत आहेत. म्हणून या वर्षी राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे स्वतंत्रपणे ‘पीजीईटी-सीईटी’ घेतली जाणार आहे. १० ते १८ मे दरम्यान या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारले जातील. पण ही परीक्षा अनेक विद्यापीठांच्या परीक्षेच्या दरम्यान म्हणजे २६ मे रोजी होणार असल्याने विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले आहे. कारण याच दरम्यान मुंबई, पुणे, सोलापूर या विद्यापीठांच्या अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्याही (बीई) परीक्षा आहेत.
‘पीजीईटी-सीईटी जरी रविवारी असली तरी आम्ही विद्यापीठ परीक्षांच्या अभ्यासात बुडून गेलेलो असतो. आमच्यासाठी विद्यापीठाबरोबरच पीजीईटीही तितकीच महत्त्वाची आहे. दोन्ही परीक्षांचा अभ्यास एकाच वेळी कसा करायचा, असा प्रश्न पुण्यातील एका विद्यार्थ्यांने केला. शिक्षकांच्या संपामुळे या वर्षी काही विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षा लांबल्या आहेत. सोलापूर विद्यापीठाची परीक्षा १४ ते २७ मेदरम्यान तर पुणे विद्यापीठाची २९ मेपर्यंत चालणार आहे. त्यामुळे पीजीईटी पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
परीक्षा पुढे ढकलणे अशक्य
सीईटीची तारीख पुढे ढकलण्याबाबत तंत्रशिक्षण संचालक सु. का. महाजन यांनी असमर्थता व्यक्त केली. ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार परीक्षांचे निकाल ७ जूनपूर्वी जाहीर करणे आवश्यक आहे. २६ मे रोजी परीक्षा घेऊनही या मुदतीच्या आत निकाल जाहीर करताना आमची तारांबळ उडणार आहे. त्यामुळे, परीक्षा आणखी पुढे ढकलणे शक्य नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले. त्यातून ७० ते ८० टक्के प्रवेशेच्छुक विद्यार्थी गेटचे असून पीजीईटीला बसणारे विद्यार्थी फार नसतील, अशी पुष्टी त्यांनी जोडली.
पुढील वर्षी परीक्षा लवकर घेऊ
विद्यापीठ परीक्षांशी ‘पीजीईटी’ची तारीख ‘क्लॅश’ झाल्याने होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणीची आपल्याला जाणीव आहे. पण पुढील वर्षी सीईटी विद्यापीठांच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी म्हणजे फेब्रुवारी-मार्चमध्येच घेतली जाईल, अशी ग्वाही सु. का. महाजन यांनी दिली.