‘नळावरच्या बायकांप्रमाणे वसावसा भांडतात’ किंवा ‘कुंम्डल्या जरूर काढा, आम्ही घाबरणार नाही’ अशा शब्दांमध्ये खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देत असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात त्याची चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने अलीकडेच मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने मुख्यमंत्र्यांवर टीका करतात. नळावरच्या बायकांप्रमाणे भांडणारे किंवा तापट स्वभावाचे असल्याने मुख्यमंत्र्यांकडे जाताना हेल्मेट घालून जा, असा सल्ला सुप्रियाताईंकडून दिला जातो. याशिवाय सुप्रियाताईंनी मुख्यमंत्र्यांवर शेलक्या शब्दांमध्ये टीकाटिप्पणी केली आहे. मराठा मोच्र्याच्या माध्यमातून आपल्या विरोधात राष्ट्रवादीकडून वातावरणनिर्मिती केली जात असल्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची भावना झाली आहे. एकूणच सध्या मुख्यमंत्री विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना जोरात रंगला आहे. एरव्ही सौम्य असलेल्या सुप्रियाताई मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्रमक का झाल्या, याबद्दल विविध तर्कवितर्क सुरू आहेत.

एकीकडे हा वाद रंगला असतानाच शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांची घेतल्याने वेगळी चर्चा सुरू झाली. मागे दुष्काळाच्या प्रश्नावर भाजप सरकार गंभीर नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीने औरंगाबादमध्ये मोठा मोर्चा काढला होता, नेमके त्याच दिवशी पवार हे मोदींच्या भेटीला गेले होते.