अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली. अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रियाला अटक केली होती. न्यायालयाने तिचा व तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीचा जामीन अर्ज फेटाळला. रिया व शोविकची न्यायालयीन कोठडी ६ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

अमली पदार्थ विकत घेणे, त्यासाठी अन्य आरोपींशी संगनमत करणे, याबाबत रियाविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा ‘एनसीबी’ने केला. ‘एनसीबी’चे पथक रियाची चौकशी करत होते. याआधी रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, नोकर दीपेश सावंत, अमली पदार्थ विक्रेता झैद विलात्रा, कैझान इब्राहिम, अब्देल बसीत परिहारसह नऊ जणांना ‘एनसीबी’ने अटक केली होती. त्यापैकी शोविक, सॅम्युअल, दीपेश यांच्यासमोर रियाची चौकशी करण्यात आली. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचे धागेदोरे अमली पदार्थाशी जोडलेले आहेत का, याबाबतही ‘एनसीबी’कडून तपास सुरू आहे.

अमली पदार्थाचे सेवन कधीच केले नाही, असा दावा रियाने याआधी माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये केला होता. मात्र, आपण शोविक, रियाच्या सांगण्यावरून अनेकदा अमली पदार्थ सुशांतच्या घरी आणले होते, असे नोकर दीपेश याने चौकशीदरम्यान सांगितल्याचा दावा ‘एनसीबी’ने न्यायालयासमोर केला होता.

सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून केंद्रीय अन्वेषण विभागाने नोंदवलेल्या गुन्ह्य़ात रिया मुख्य आरोपी आहे. आर्थिक गैरव्यवहाराबाबत सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी केलेल्या आरोपप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) तपास सुरू आहे. रिया आणि अन्य आरोपींनी भ्रमणध्वनीतून काढून टाकलेले व्हॉट्सअ‍ॅप संदेश ईडीने प्राप्त केले. त्यातून रिया आणि अन्य आरोपी अमली पदार्थ विक्रेत्यांच्या संपर्कात होते, अशी माहिती पुढे आली. त्यानंतर ‘एनसीबी’ने गुन्हा नोंदवून या प्रकरणी तपास सुरू केला.