सारे काही मित्रांसाठी

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करण्याचा निर्णय घेतला तेव्हाच काही काँग्रेस नेत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. काँग्रेसला अपशकुन केला जाईल, अशी भीतीही पक्षाच्या बैठकीत बोलून दाखविण्यात आली होती. तेव्हा आघाडी धर्म आपण तरी पाळू या, असे शंका व्यक्त करणाऱ्यांना सुनावले गेले. निवडणुका तोंडावर ही शंका व्यक्त करणाऱ्यांची शंका खरी ठरू लागली आहे. काँग्रेसचे संख्याबळ कमी करण्याचा प्रयत्न मित्र पक्षाकडूनच होईल, असा पक्षात एक मतप्रवाह होता. काँग्रेसला राज्यात चांगल्या यशाची अपेक्षा नाही. अहमदनगरच्या जागेबाबत काँग्रेसला आशा होती. अहमदनगर हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असला तरी या पक्षाकडे प्रभावी उमेदवार नाही. यामुळेच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पुत्रासाठी हा मतदारसंघ मिळावा, असा आग्रह धरला होता. पण राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी हा मतदारसंघ सोडण्यास नकार दिला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींपासून ते साऱ्या नेत्यांनी प्रयत्न करून बघितले, पण पवार काही बधले नाहीत. काँग्रेसची निवडून येऊ शकली असती अशी एक जागा गमवावी लागली. असे काँग्रेस नेत्यांचे ठाम मत आहे. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी वर्धा किंवा सांगलीची जागा सोडण्याकरिता काँग्रेसवर दबाव आहे.  हे मतदारसंघ काँग्रेससाठी अनुकूल आहेत. १९६२ पासून सांगलीची जागा काँग्रेस सातत्याने जिंकत आला आहे. अपवाद फक्त २०१४चा.  वर्धा मतदारसंघात काँग्रेसला नेहमी विजय मिळायचा. शेट्टी यांच्या पक्षाची वध्र्यात फार ताकद नाही. तरीही या मतदारसंघावर त्यांनी दावा केला. दुसरीकडे, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिंडोरीच्या जागेवर दावा केला होता. पण राष्ट्रवादीने या मतदारसंघातील उमेदवार जाहीरही करून टाकला. एकेक जागा काँग्रेससाठी महत्त्वाची आहे. पण मित्र पक्षांच्या दबावापुढे काँग्रेसला नमते घ्यावे लागत आहे.

गडकरींची दुचाकी!

केंद्राच्या राजकारणात स्वतचा वेगळा ठसा उमटविणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गाडीच्या मागे पुढे दहा ते बारा वाहनांचा ताफा राहायचा. परंतु आता ते लोकसभा निवडणुकीत उमेदवार असल्याने हा ताफा मागे सुटला आहे. परिणामी गडकरी शहरात काही ठिकाणी हेल्मेट घालून दुचाकीने फिरत आहेत. याच दुचाकी परिक्रमेत त्यांनी परवा बजाजनगर चौकात हातठेल्यावरील पाणीपुरी आणि भेळेचा आस्वाद घेतला. शनिवारी गडकरी यांचे नागपुरात आगमन झाल्यानंतर ते नातवाला सोबत घेऊन सुरुवातीला मेट्रोमध्ये बसले. बर्डीपर्यंत त्यांनी मेट्रो प्रवास केल्यानंतर ते अजनी रेल्वे स्थानकाजवळ पोहोचले. दक्षिण अंबाझरी मार्गावरील मुंडले हायस्कूलपर्यंत त्यांनी बसने प्रवास केला. यानंतर ते बसमधून उतरले आणि एका कार्यकर्त्यांला दुचाकी मागितली आणि सुरक्षा रक्षकाला मागे बसवत स्वत गाडी घेऊन निघाले. त्यांची दुचाकी बजाजनगरात चौकात पोहोचली आणि त्यांनी पाणीपुरी व भेळीचा मनसोक्त आस्वाद घेतला.

८१ वर्षीय ‘तरुण’ निवडणूक रिंगणात

महाराष्ट्र वारकरी संघटनेचे अध्यक्ष विष्णुपंत कुंभार, वय वर्षे ८१. त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे. विष्णुपंत आता बाशिंग बांधून निवडणुकीच्या मांडवात माढा मतदारसंघातून उभे राहणार आहेत. या निवडणुकीच्या तयारीला लागण्यासाठी विष्णुपंतांनी मंगळवारी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच धडक मारली.  ग्रामस्थ, वारकरी आपला प्रचार व खर्च करायला तयार असल्याचा दावा विष्णुपंतांनी केला. विष्णुपंतांनी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याविरुद्ध दक्षिण सोलापूरमधून विधानसभा निवडणूकही लढविली होती. जिल्हा परिषद व अन्य निवडणुकाही त्यांनी लढविल्या आहेत. या ८१ वर्षीय विष्णुपंतांचा उत्साह पाहून निवडणूक कार्यालयातील कर्मचारीही थक्क झाले.

मुंबईवाला