वाढत्या गर्दीमुळे उपनगरी रेल्वेमधून पडून होणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. मध्य व पश्चिम रेल्वेवर अशा प्रकारच्या घटनांमुळे ऑक्टोबर महिन्यात १० जणांचा मृत्यू झाला आहे. यात

१२ ऑक्टोबरला लोकलमधून पडल्याने तीन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद लोहमार्ग पोलिसांकडे झाली आहे. याशिवाय रूळ ओलांडतानाही उपनगरी रेल्वेची धडक लागून ३२ जण ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

उपनगरी रेल्वेतून पडल्याने १ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबपर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. १२ ऑक्टोबरला पश्चिम रेल्वेच्या नायगाव ते भाईंदर स्थानकादरम्यान सकाळी आठच्या सुमारास ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. दुपारी पावणेतीन वाजता हार्बर रेल्वे मार्गावरील रबाळे ते ऐरोलीदरम्यान ७५ वर्षीय महिलेचा आणि मध्यरात्री तीन वाजता दादर स्थानकाजवळ अशाच एका घटनेत २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

११ ऑक्टोबरलाही गोरेगाव ते मालाडदरम्यान दुपारी १२.१२ वाजता ७८ वर्षीय आणि रात्री सव्वा अकराच्या सुमारास डॉकयार्ड रोड ते रे रोड स्थानकादरम्यान ३८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली. याचप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात प्रभादेवी ते लोअर परळ, अंबरनाथ ते बदलापूर, सीएसएमटी ते भायखळा, ठाकुर्लीदरम्यानही लोकलमधून पडल्याने प्रवाशांचे मृत्यू झाले आहेत.

रूळ ओलांडताना उपनगरी रेल्वे किंवा मेल-एक्स्प्रेसची धडक लागल्याने होणाऱ्या अपघातांचेही प्रमाण कमी झालेले नाही. ऑक्टोबर महिन्यात अशा प्रकारच्या घटनेत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. पादचारी पूल, संरक्षक जाळ्या इत्यादी उपाययोजना करूनही परिस्थिती जैसे थेच आहे.