सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली शटल विद्याविहार स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांनीच रोखली. मुंबईतल्या विद्याविहार स्टेशनजवळ ही घटना नुकतीच घडली आहे.या शटलमध्ये चढायलाही जागा नाही. आधी लोकल सुरु करण्यात आली होती. मात्र त्यातही कर्मचाऱ्यांची गर्दी होत असल्याने त्या जागी शटल सुरु करण्यात आली. मात्र या शटलच्या डब्यांमध्ये उभं राहण्यासही जागा नाही त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग कसे पाळणार? असा प्रश्न विचारत मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनीच ही शटल रोखून धरली. मुंबई ट्रेन अपडेट्स या ग्रुपवरही या संदर्भातलं वृत्त देण्यात आलं आहे

मुंबईत रेल्वे कर्मचाऱ्यांना जाता यावं म्हणून शटल सुरु करण्यात आली. मात्र आता या शटलमध्येही गर्दी होऊ लागली आहे. अत्यावश्यक सेवेतील कामगार असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी लॉकडाउनच्या काळातही काम सुरु ठेवलं आहे. लोकल सेवा पूर्णपणे बंद असल्याने कामगारांची ने आण करण्यासाठी शटल सेवा सुरु करण्यात आली. मात्र छत्रपती शिवाजी टर्मिनस या स्थानकातूनच ही शटल भरुन येत असल्याची तक्रार हे कर्मचारी करत आहेत. मधल्या स्टेशन्सवर कामगारांना या शटलमध्ये पाय ठेवण्यासही जागा नसते. त्यामुळे विद्याविहार या स्थानकात रेल रोको करण्यात आला. कामगारांच्या संतापाचा उद्रेक झाल्याच यामुळे पाहण्यास मिळालं.