मराठा आरक्षणाचं आंदोलन आता थांबायला हवे असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले आहे. तसेच मराठा आरक्षण द्यायचे असेल तर घटना दुरूस्तीची गरज नाही असेही नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वीच मराठा आरक्षण द्यायची इच्छा असेल तर केंद्र सरकारने घटनादुरूस्ती करावी असे मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले होते. तसेच सरकारने तशी तयारी दर्शवल्यास आपण विरोधकांना त्याची गरज समजावून सांगू असेही शरद पवारांनी म्हटले होते. आता नारायण राणे यांनी ही भूमिका खोडून काढत घटना दुरूस्तीची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. ‘झी चोवीस तास;’ या मराठी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शरद पवारांचे मत खोडून काढले आहे.

याच सोबत नारायण राणे यांनी मराठा बांधवांना शांततेचे आवाहन केले आहे. येत्या तीन महिन्यात हा प्रश्न निकाली लागेल आंदोलनात हिंसा करून काहीही साध्य होणार नाही असेही नारायण राणे यांनी स्पष्ट केले. आंदोलनाला हिंसक वळण लागण्यामागे राजकीय पक्ष असल्याचा आरोपही नारायण राणेंनी केला. शरद पवार हे राज्याचे चारवेळा मुख्यमंत्री होते त्यांनी आंदोलनाला लागलेले हिंसक वळण रोखण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असेही मत त्यांनी व्यक्त केले. मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने महाराष्ट्राच्या प्रतीमेला काळीमा लागतो आहे. हीच बाब लक्षात घेऊन मराठा बांधवांनी आंदोलन मागे घ्यावे असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

आपल्याला ठाऊकच आहे आषाढी एकादशीपासूनच राज्यात मराठा आरक्षणाचा प्रस्न पेटला आहे. मुंबईसह राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये या आंदोलनाला हिंसक वळणा लागले आहे. अशात शरद पवारांनी आरक्षणासाठी घटनादुरूस्तीचा उपाय सुचवला होता. मात्र त्यांचा हा उपाय खोडून काढत आणखी तीन महिन्यात हा प्रश्न निकाली लागेल असेही स्पष्ट केले.