मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नसल्याने राज्य सरकारकडून वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केला. मद्यालये उशिरापर्यंत सुरू तर मंदिरे मात्र तासभरही उघडण्याची परवानगी नाही. करोना काळात मोठा भ्रष्टाचार सुरू असून या सरकारचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी भाजप रस्त्यावर उतरेल, असा इशाराही  त्यांनी दिला.

भाजप प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत बोलताना फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, आमच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने आम्ही केलेला कायदा योग्य नव्हता, असे म्हटले जाते. पण तो उच्च न्यायालयाने वैध ठरविला. या सरकारच्याच मनात काळेबेरे असल्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केल्यावर त्यावर घटनापीठापुढे सुनावणी व्हावी, अशी विनंती सरन्यायाधीशांपुढे महिनाभरात सरकारने केली नाही. आता ओबीसी संवर्गातून आरक्षण देण्याचा मुद्दा मांडण्यात येत आहे. मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आमच्या सरकारने दिले, तसेच आरक्षण मिळावे, अशी भाजपची भूमिका आहे.

मराठा व ओबीसी समाजाला एकमेकांमध्ये झुंजवत ठेवण्याचा प्रयत्न काहीजण करीत आहेत. समाजात तेढ निर्माण होऊ नये, अशी खबरदारी घेतली पाहिजे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेवरूनही मतमतांतरे असून सरकारने दोन्ही बाजूंच्या नेत्यांना समोरासमोर बसवून सर्वसहमतीने मार्ग काढला पाहिजे, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.

करोनामुळे मंदिरे अजूनही बंद ठेवण्यात आली आहेत, याविषयी फडणवीस म्हणाले, ‘‘या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, असा प्रश्न विचारण्याची वेळ आज आली आहे. मद्यालये उशिरापर्यंत सुरू ठेवल्याने करोना पसरत नाही, मात्र मंदिरे तासभरही उघडी ठेवण्याची परवानगी नाही, याचे काय कारण आहे. देव, देश व समाजाप्रती बांधिलकीच्या माध्यमातून आम्ही २५ वर्षे एकत्र काम केले. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एवढे कसे बदलले?  मित्र बदलले, पण ही बांधिलकी कशी विसरलात? हे बेईमानीने सत्तेवर आलेले सरकार असून ही जनतेशी बेईमानी भाजपने केलेली नाही. ’’