मध्य रेल्वेवर कल्याण-ठाणे, कल्याण-मुंब्रा आणि ठाणे ते लोकमान्य टिळक टर्मिनस (पाचवा आणि सहावा रेल्वेमार्ग) डीसी-एसी परिवर्तनासाठी ११ आणि १२ जानेवारी २०१४ रोजी रात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. दोन्ही दिवशी रात्री १२.३० ते पहाटे ४ या वेळेत हा ब्लॉक घेण्यात येणार असून या कामामुळे सध्याच्या १,५०० व्ॉट (डीसी) वरून वीजेचा प्रवाह २५ हजार व्ॉट (एसी) होणार आहे.
 या दोन दिवशी कल्याण ते ठाणे (अप डाऊन जलद मार्गावर) आणि कल्याण ते मुंब्रा (अप डाऊन धीमा मार्ग) तसेच ठाणे (फलाट क्रमांक ७ आणि ८) ते लोकमान्य टिळक टर्मिनस  येथे हा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत ठाणे ते कल्याण आणि पुढे कर्जत व कसाऱ्याच्या दिशेने रेल्वे बंद राहणार आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून डाऊन दिशेने रात्री १२.१४ वाजता कसारा आणि १२.३८ वाजता कर्जत या दोन विशेष गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. कसारा येथून सीएसटीच्या दिशेने शेवटची गाडी १०.३५ वाजता सुटेल. ही गाडी गाडी कल्याण येथे ११.५०, ठाणे येथे १२.२२ वाजता आणि सीएसटी येथे १ वाजून १८ ला पोहोचेल. तर बदलापूर येथून सीएसटीच्या दिशेने शेवटची गाडी रात्री ११.४५ वाजता सुटणार आहे. ही गाडी कल्याणला १२.०९, ठाण्याला १२.३९ आणि सीएसटीला रात्री १ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचणार आहे.