करोनाची साखळी तोडण्यासाठी जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या राज्य सरकारच्या आदेशाविरोधात मंगळवारी राज्यात ठिकठिकाणी व्यापारी रस्त्यावर उतरले. सरकारने आदेशात सुधारणा करावी, अन्यथा शुक्रवारपासून सर्व दुकाने सुरू करण्याचा इशारा ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ या संघटनेने दिला.
मंगळवारी सकाळी पोलिसांनी जीवनावश्यक वगळता अन्य दुकाने बंद करण्याचे आवाहन करताच व्यापाऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली. भाजपची स्थानिक मंडळी व्यापाऱ्यांच्या बाजूने उभी राहिली आणि दुकाने सुरू ठेवावीत, अशी मागणी केली.
करोना संसर्ग प्रतिबंधासाठी शासनाने जारी केलेल्या नव्या निर्बंधांबाबत गैरसमज पसरल्याने मंगळवारी गोंधळ उडाला. राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. मात्र, पोलिसांनी समजूत काढत, कारवाईचा धाक दाखवत, सौम्य बाळाचा वापर करत निर्बंधांची अंमलबजावणी केली.
मुंबईतील महत्वाच्या आणि मध्यवर्ती असलेल्या बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी आदेशाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. दादरमध्ये व्यापाऱ्यांनी सोमवारी रात्रीपासूनच निषेधाला सुरवात केली. दुकानाबाहेर निषेध फलक लावले.
दादर स्थानक ते शिवाजी पार्क परिसरातील दुकाने मात्र सकाळी उघडण्यात आली होती. दुकानांमध्ये ग्राहकांचा वावरही होता. परंतु, दुपारी बाराच्या सुमारास पोलिसांनी कारवाई करण्यास सुरवात केल्याने व्यापाऱ्यांनी त्यांना विरोध केला. प्रत्येकजण आपली व्यथा मांडत होता. व्यापारी आणि कामगारांच्या गर्दीमुळे दादर स्थानकाबाहेरचा परिसर गजबजला होता. अखेर पोलिसांनी व्यापाऱ्यांची समजूत घालून परिस्थिती नियंत्रणात आणली.
अंधेरी-बोरीवलीमध्येही अशाच पद्धतीने निषेध करण्यात आला. बोरीवली पूर्वेकडील व्यापाऱ्यांनीही घोषणाबाजी केली. दुकानांच्या दारावर ‘बोरिवली ईस्ट व्यापारी असोसिएशन’तर्फे निषेध फलक लावण्यात आले. भेंडी बाजार येथील व्यापाऱ्यांनीही पोलिसांच्या कारवाईत आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. शेकडो लोक रस्त्यावर आल्याने काही काळ या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. झवेरी बाजारातील व्यापारीही आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
पनवेल, मुरुडमध्ये निदर्शने
अलिबाग : आदेशाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रि या रायगड जिल्ह््यातही उमटली.पनवेल आणि मुरुड येथे व्यापाऱ्यांनी निदर्शने केली.
ठाणे, उल्हासनगरमध्ये आंदोलन
ठाणे : ठाणे आणि उल्हासनगर शहरांत व्यापाऱ्यांनी आंदोलन करत दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी केली. उल्हासनगरमध्ये व्यापारी आणि पोलीस यांच्यात झटापट झाली असून त्यात एका व्यापाऱ्याला दुखापत झाली आहे.शनिवार आणि रविवारी संपूर्ण टाळेबंदी असेल आणि इतर दिवस दुकाने खुली राहतील असा व्यापाऱ्यांचा समज झाला होता. यातून त्यांनी मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुकाने सुरू केली. मात्र, पोलिसांनी काही वेळानंतर दुकाने बंद केली. ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ आणि जिल्ह््याच्या ग्रामीण भागात हे चित्र दिसून आले. दुकाने बंद केल्यामुळे व्यापाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत होता. ठाण्यातील नौपाडा आणि कळवा भागात व्यापाऱ्यांनी नव्या आदेशाविरोधात आंदोलन करत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी केली. तर व्यापारी शहर म्हणून ओळख असलेल्या उल्हासनगर शहरातील व्यापारी सुरुवातीपासून पुन्हा टाळेबंदीच्या विरोधात होते.