रेल्वेमंत्री पवन बन्सल यांनी मूळ प्रवासी भाडय़ात प्रत्येक किमी अंतरासाठी दोन पैसे किमान वाढ केल्याने पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रलच्या पुढे आणि मध्य रेल्वेवर भायखळा तसेच हार्बर मार्गावर डॉकयार्ड रोडच्या पुढील प्रवास महागणार आहे. दुसऱ्या वर्गाच्या भाडय़ात अशी वाढ होत असतानाच प्रथम वर्गाच्या भाडय़ामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. प्रवासी भाडे पाच रुपयांच्या पटीत वाढविण्याचा प्रस्ताव रेल्वेमंत्र्यांनी मांडला असल्याचे सांगण्यात येते.

सध्या ३५ किमी अंतरावरील स्थानकांचे तिकीट आठ रुपये आहे, ते आता १० रुपये इतके होईल. दुसऱ्या वर्गाच्या मासिक पासाच्या भाडय़ात ३५ किमीच्या पुढे आता पासासाठी १३० ऐवजी १६० रुपये मोजावे लागतील. मेल-एक्स्प्रेस गाडय़ांच्या दुसऱ्या वर्गाच्या भाडय़ात १२ रुपयांची, तर स्लीपर क्लासमध्ये ४० रुपयांची वाढ प्रस्तावित आहे. वातानुकूलित चेअर कारमध्ये ४० तर वातानुकूलित थ्री टियरमध्ये ७६ रुपयांची वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.

उपनगरी रेल्वे प्रवासाच्या भाडय़ात १ जानेवारीस प्रथम तसेच दुसऱ्या वर्गाच्या प्रवासी भाडय़ात मुंबई उपनगरी वाहतूक प्रकल्पाच्या अधिभारापोटी वाढ करण्यात आली होती. त्यापूर्वी सेवा करापोटी गेल्या वर्षांत प्रथम वर्गाच्या भाडय़ात वाढ करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या भाडेवाढीमध्ये तिकिटामधील विकास शुल्क तिकिटाच्या मूळ भाडय़ात अंतर्भूत करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मुंबई उपनगर वाहतूक प्रकल्पाचा अधिभार कायम राहणार आहे. सध्या दुसऱ्या वर्गाच्या तिकिटामध्ये एक रुपया, तर प्रथम वर्गाच्या तिकिटामध्ये २० रुपये आणि मासिक पासामध्ये दुसऱ्या वर्गामध्ये १० तर प्रथम वर्गाच्या पासामध्ये २० रुपये विकास शुल्क अंतर्भूत आहे.

 

अशी आहे वाढ..
सामान्य श्रेणीतील ३५ किमीपर्यंतच्या उपनगरी प्रवासासाठी दोन रुपयांची भाडेवाढ झाली असून, बिगरउपनगरी रेल्वेच्या १३५ किमी प्रवासासाठी सरासरी पाच रुपयांची वाढ झाली आहे. स्लीपर श्रेणीसाठी ७७० किमीपर्यंत ५० रुपयांची भाडेवाढ झाली आहे. एसी चेअर कारमधून ३८७ किमीच्या प्रवासासाठी ४० रुपयांनी भाडेवाढ झाली आहे. वातानुकूलित तिसऱ्या श्रेणीच्या ७१७ किमीपर्यंतच्या प्रवासासाठी ७६ रुपये जादा मोजावे लागतील. वातानुकूलित दुसऱ्या श्रेणीतून ७२१ किमी अंतरापर्यंतच्या प्रवासासाठी ४८ रुपयांची वाढ झाली आहे. वातानुकूलित प्रथम श्रेणीतून ५४७ किमीपर्यंतच्या प्रवासासाठी ५६ रुपये जादा द्यावे लागतील. वाढीव प्रवासी भाडय़ामुळे आता दिल्ली ते मुंबई स्लीपर श्रेणीचे भाडे ४१८ ऐवजी ५०१ रुपये, एसी-३ चे ११६२ ऐवजी १३०० रुपये, एसी-२ साठी १८१० ऐवजी १९४८ रुपये, एसी-१साठी ३१२० ऐवजी ३१६१ रुपये भाडे आकारले जाईल.

 

भाडेवाढ मूळ तिकिटाच्या भाडय़ात
रेल्वेमंत्री पवन बन्सल यांनी बुधवारी केलेली भाडेवाढ ही तिकीटाच्या मूळ भाडय़ात केली आहे. रेल्वेच्या विविध कामांसाठी आकारण्यात येत असलेले विकास शुल्क हे या तिकीटाच्या मूळ भाडय़ामध्ये अंतर्भूत करण्यात आले आहे. मुंबई उपनगर वाहतूक प्रकल्पासाठी आकारण्यात आलेला अधिभार मात्र वेगळा ठेवण्यात आला आहे.