पुढील दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. किनारपट्टीवर पावसाचा जोर सध्या ओसरला असून केवळ पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यत गुरुवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

उत्तर भारतातील सक्रीय पावसामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. सातारा, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी बुधवार आणि गुरुवारी मुसळधार पाऊस पडू शकतो. तर इतरत्र हलका ते मध्य पावसाची शक्यता आहे.

गेल्या आठवडय़ात मुंबईसह किनारपट्टीवर अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. मात्र त्यानंतर पावसाने पूर्णपणे दडीच मारली आहे. परिणामी कमी झालेल्या किमान आणि कमाल तापमानात पुन्हा दोन ते तीन अंशाने वाढ झाली.