News Flash

कचरा वर्गीकरणामुळे कचरावेचक बेरोजगार

घाटकोपर येथील आमच्या संकुलात एक भंगारविक्रेताच येऊन विक्रीयोग्य वस्तू घेऊन जात आहे.

कचरा वर्गीकरणामुळे कचरावेचक बेरोजगार
कचऱ्यातून वेचकांना विक्रीयोग्य वस्तूच मिळत नसल्याचे समोर आले आहे.

सुक्या कचऱ्यातून विक्रीयुक्त वस्तू लंपास

कचरा वर्गीकरण केंद्रांमधून कचरावेचकांना रोजगार मिळवून देण्याची पालिकेची योजना असली तरी प्रत्यक्षात कचरावेचकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. मोठय़ा रहिवासी सोसायटय़ांमधून ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण सुरू झाले असले तरी प्रत्यक्षात वॉर्ड पातळीच्या कचरा केंद्रांवर येणाऱ्या सुक्या कचऱ्यातून विक्रीयोग्य कचराच सापडत नसल्याने दिवसभर राबूनही कचरावेचकांची झोळी रिकामीच राहते. सुका कचरा वेगळा असल्याने काही ठिकाणी थेट भंगारवालेच इमारतीच्या डब्यातून विक्रीयुक्त कचरा घेऊन जात आहेत.

पूर्वी ओला व सुका कचरा एकाच गाडीतून कचराभूमीवर नेला जात असे व कचरावेचक त्यातून विक्रीयोग्य वस्तू बाजूला काढत असत. मात्र आता प्रत्येक वॉर्डमध्ये कचरा केंद्रीकरण सुरू करण्यात आले आहे. वॉर्डाच्या विविध इमारतींमधून गोळा करण्यात आलेला कचरा या केंद्रावर नेण्यात येतो. मात्र या कचऱ्यातून वेचकांना विक्रीयोग्य वस्तूच मिळत नसल्याचे समोर आले आहे.

मध्य मुंबईत काही मोठय़ा सोसायटय़ांमधील सुका कचरा पालिकेच्या गाडीतून आठवडय़ातील दोन दिवस वर्गीकरण केंद्रावर पोहोचवला जातो. तिथे कचरावेचकांनी त्यातून विक्रीयोग्य वस्तू बाजूला काढणे अपेक्षित असते. या वस्तू विकून त्यांना पैसे मिळत असल्याने पालिकेकडून त्यांना रोजगार दिला जात नाही. मात्र सोसायटीमधून देण्यात येणाऱ्या सुक्या कचऱ्यात विक्रीयोग्य वस्तूच नसल्याने दिवसभर राबूनही हाती पैसे पडत नसल्याने कचरावेचकांनी पालिकेला बोल लावण्यास सुरुवात केली आहे, असे एका वॉर्डच्या साहाय्यक आयुक्तांनी सांगितले.

घाटकोपर येथील आमच्या संकुलात एक भंगारविक्रेताच येऊन विक्रीयोग्य वस्तू घेऊन जात आहे. त्याबद्दल त्याला हटकलेही, मात्र थेट कचरावेचकांना मिळणे अपेक्षित असलेल्या वस्तू मधल्या मधे जात असल्याचे दिसून येते, असे घाटकोपर येथील कल्पतरू सोसायटीतील रहिवासी असलेल्या शुभा बेनुरवार यांनी सांगितले. जोपर्यंत ओला व सुका कचरा एकत्र येत होता तेव्हा त्या घाणीला हात लावण्याची कोणाची तयारी नसे व ते काम कचरावेचकांवर पडत असे. आता वर्गीकरण सुरू झाल्यावर इमारतीतील कचरा गोळा करणारे, सुरक्षारक्षक या कचऱ्यातील विक्रीयोग्य वस्तूंमधून नफा मिळवतात, असे स्त्रीमुक्ती संघटनेच्या ज्योती म्हापसेकर म्हणाल्या. पुण्याप्रमाणेच मुंबईतही कचरावेचकांनाच कचरा घरोघरी कचरा गोळा करण्याची अनुमती मिळाली तर त्यांचा रोजगार बुडणार नाही. शिवाय कचरावेचकच ओल्या कचऱ्यातून खत तयार करण्याचीही जबाबदारी घेऊ शकतील, असेही म्हापसेकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2017 4:51 am

Web Title: waste pickers unemployed due to garbage classification
Next Stories
1 वैद्यकीय निष्काळजीच्या आरोपांतून १५ वर्षांनी मुक्तता!
2 चकमकफेम प्रदीप शर्मा पुन्हा पोलीस सेवेत
3 प्राचीन इराणी लिपी चित्रांतून बोलकी
Just Now!
X