मुंबईत जागाच नसल्यामुळे पाणी साठवण्यासाठी एकमेव पर्याय

इंद्रायणी नार्वेकर, मुंबई</strong>

पावसाचे पाणी साठवण्यासाठी जपानमधील टोकियो शहराच्या धर्तीवर मुंबईतही मोठमोठे जलबोगदे तयार करण्याचे पालिकेने ठरवले असले तरी शहरात पुरेशी जागा नाही. त्यामुळे शहरातील उद्यानांच्या खाली हे जलबोगदे तयार करण्याची योजना पालिकेने आखली आहे. भरतीच्यावेळी खूप मोठा पाऊस पडल्यास शहरात पाणी तुंबू नये म्हणून पावसाचे पाणी या बोगद्यांमध्ये साठवून नंतर ते समुद्रात सोडण्याची ही योजना आहे. त्याकरिता पालिका अभ्यास करीत आहे.

मुंबईची रचना बशीप्रमाणे आहे. अशी विशिष्ट भौगोलिक परिस्थिती असल्याने आणि चहुबाजूने समुद्र असल्याने थोडासा पाऊस पडला आणि त्याच वेळी समुद्राला भरती आली की मुंबईत सर्वत्र पाणी तुंबते. रस्ते, रेल्वे रूळ आदी ठिकाणी पाणी तुंबल्याने, नद्या-नाले भरून वाहू लागल्याने दरवर्षी पावसाळ्यात मुंबई ठप्प होते. पाण्याचा निचरा वेगाने करण्यासाठी महापालिकेने आता जपानी तंत्रज्ञान वापरण्याचे ठरवले आहे. जपानमधील टोकियो शहरात जमिनीखाली मोठमोठे जलबोगदे तयार करून त्यात पावसाचे पाणी साठवून नंतर ओहोटीच्यावेळी समुद्रात सोडले जाते. ही उपाययोजना यशस्वीपणे अमलात आल्यानंतर टोकियो शहर पूरमुक्त झाले. याच प्रकारची उपाययोजना मुंबईत राबविता येऊ  शकते का, याची चाचपणी पालिकेतर्फे सुरू आहे. जपानमधील संबंधित संस्थेचे अधिकारी व तंत्रज्ञ यांनी नुकतीच मुंबईत येऊन पाहणीही केली. त्यांनी येथील तलावांचा, नद्यांचा व पाणी साचणाऱ्या परिसरांचा अभ्यास दौराही केला.

पावसाळ्याच्या काळात काही परिसरांमध्ये पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागतो. पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक जलद गतीने व्हावा यासाठी महानगरपालिकेने आतापर्यंत अनेक उपाययोजना केल्या. त्यापैकी ब्रिमस्ट्रोवॅड प्रकल्पांतर्गत पम्पिंग स्टेशन उभारण्यात आली आहेत. तसेच नद्या व नाल्यांचे रुंदीकरण करण्यात आले. मात्र अद्यापही मुंबईत पाणी तुंबण्याची समस्या सुटलेली नाही. गेल्या पावसाळ्यात सातत्याने झालेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागला. परिणामी, नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे पालिकेने जपानी तंत्रज्ञान मुंबईच्या समस्येवर उपयोगी पडते का हे पाहायचे ठरवले आहे. मात्र एवढे मोठे बोगदे खोदण्यासाठी मुंबईत जागाच नसल्यामुळे हे बोगदे विहिरींच्या स्वरूपात उद्यानांमध्ये खणण्याचा पालिकेचा विचार आहे, अशी माहिती उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली. बोगदे बांधून झाल्यानंतर ते वरून पूर्णत: झाकले जाणार आहेत. त्यामुळे उद्यान पुन्हा पूर्ववत होणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र हे काम प्राथमिक स्तरावर असून त्यावर अद्याप अभ्यास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्याकरिता पालिकेच्या अधिकाऱ्यांची एक टीम जपानलाही जाऊन पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माटुंगा, सायन, परळमध्ये बोगदे

मुंबईत दरवर्षी मिठी नदीच्या परिसरात पाणी तुंबते. परंतु, पूर्व उपनगरात पालिकेचे एकही पम्पिंग स्टेशन नाही. त्यामुळे हिंदमाता, सायन, माटुंगा या परिसरांत सर्वात जास्त पाणी तुंबण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे माटुंगा, सायन, परेल या परिसरातील उद्यानांमध्ये हे बोगदे खणण्याचा पालिकेचा विचार आहे. भरतीच्यावेळी पम्पिंग स्टेशनमधून पाणी समुद्रात सोडण्यासही मर्यादा येतात. त्यामुळे मोजक्याच ठिकाणी हे बोगदे खणले जातील.