X
Advertisement

वाझे, शिंदेच्या आर्थिक नोंदींची सीबीआयकडून चौकशी

गिरगाव चौपाटीजवळील क्लबमधून वाझे यांची नोंदवही एनआयएला मिळाली.

उद्योगपती मुकेश अंबानी धमकी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आतापर्यंत केलेल्या तपासासह मुख्य आरोपी सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांनी नोंद करून ठेवलेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करणार आहे. तशी परवानगी ‘एनआयए’च्या विशेष न्यायालयाने सीबीआयला दिली.

तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्र आणि याचिकेद्वारे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात गंभीर आरोप केले होते. याचिकेच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने सीबीआयला दोन आठवड्यात प्राथमिक चौकशी पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सीबीआयने चौकशीस सुरुवात केली. आरोपकर्ते सिंग, वाझे, अ‍ॅड. जयश्री पाटील यांच्यासह पाच जणांचे जबाब नोंदवल्यानंतर गुरुवारी सीबीआयने न्यायालयाकडे अंबानी धमकी, मनसुख हत्येप्रकरणी एनआयएने केलेल्या तपासाशी संबंधित कागदपत्रे पाहण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली. न्यायालयाने तशी परवानगी सीबीआयला दिली.

निलंबित पोलीस शिपाई शिंदे याच्याकडे शहरातील सुमारे ३२ मद्यालये, हुक्का पार्लर, पब आदी आस्थापनांकडून दरमहा गोळा केलेल्या हप्त्याबाबत नोंद आढळली, तर गिरगाव चौपाटीजवळील क्लबमधून वाझे यांची नोंदवही एनआयएला मिळाली. त्यात काही पोलीस अधिकारी, विभागांची नावे आणि त्यासमोर रकमेचा उल्लेख असल्याचा दावा एनआयएने के ला. सीबीआयने या नोंदी तपासल्या असून त्याआधारे चौकशी सुरू केल्याचे समजते.

वाझे न्यायालयीन कोठडीत

अंबानी धमकी प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे यांना विशेष न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्यांना संध्याकाळी तळोजा कारागृहात पाठवण्यात आले. जिवाला धोका संभवत असल्याने वाझेंना कारागृहातील सुरक्षित कक्षात ठेवावे, अशी मागणी त्यांचे वकील अ‍ॅड. आदाब पोंडा यांनी केली. दरम्यान गुरुवारच्या सुनावणीत एनआयएचे वकील अ‍ॅड. सुनील गोन्साल्वीस यांनी वाझे यांचे पत्र माध्यम, समाजमाध्यमांवर जाहीर झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आधीच्या तारखेस वाझे यांनी हे पत्र न्यायालयात सादर करण्याचा प्रयत्ना केला होता. मात्र न्यायालयाने त्यांना योग्य ती प्रक्रि या अवलंबून म्हणणे मांडण्याची सूचना केली.

परमबीर सिंह साक्षीदार?

अंबानी धमकी, मनसुख हत्या प्रकरणात तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह महत्त्वाचे साक्षीदार असल्याचा दावा गुरुवारी एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमांसमोर केला. या प्रकरणांत वाझे यांचा सहभाग पुढे आल्यानंतर सिंह यांची मुंबई पोलीस दलाच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली. मात्र त्यांनी देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले. तसेच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही केली. ती फेटाळण्यात आल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात याचिका के ली होती. दोन दिवसांपूर्वी एनआयएने त्यांच्याकडे सुमारे साडेतीन तास चौकशी केली.

22
READ IN APP
X