पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने सुरु आहे. वांद्रे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. चौथा शनिवार असल्या कारणाने आज अनेकांची सुट्टी आहे. यामुळे बिघाड झाला असला तरी स्थानकांवर गर्दी होण्याची शक्यता कमी आहे. मात्र कामानिमित्त घराबाहेर पडलेल्यांना थोडा त्रास सहन करावा लागू शकतो.

पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक
पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री ११ ते २ या वेळेत वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. लांबपल्ल्याच्या गाडय़ा १० ते १५ मिनिटे उशिराने चालविल्या जातील. तसेच रविवारी पश्चिम रेल्वेवर ब्लॉक घेण्यात आलेला नाही.

मध्य, ट्रान्स हार्बरवर उद्या मेगाब्लॉक
रविवारी कल्याण स्थानकातून सुटणाऱ्या सर्व जलद लोकल गाडय़ा दिवा ते परेल स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत. त्यानंतर या लोकल परेल स्थानकाहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाकडे पुन्हा जलद मार्गावरून धावतील.

अप जलद मार्गावरील लोकल सकाळी १०.३७ ते दुपारी ३.०६ वा. या वेळेत दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला, तर डाऊन जलद मार्गावरील जलद तसेच अर्धजलद लोकल या स. १०.०५ ते दु.३.२२ वा. या वेळेत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांत थांबतील. रविवारी ठाणे ते वाशी ट्रान्स हर्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात आला असून अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ या वेळेत वाहतूक बंद राहणार असून प्रवाशांना हार्बर तसेच मुख्य मार्गिकेवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.