कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांना तब्बल १३ हजार मतांचे मताधिक्य मिळाल्याने पक्षातील जितेंद्र आव्हाड गट कमालीचा आक्रमक झाला असून जिल्ह्य़ात लाल दिवे मिरविणाऱ्या स्वपक्षातील नेत्यांना हा गट लक्ष्य करू लागल्याने पक्षात नवा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पालकमंत्री गणेश नाईक, मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्यासह विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूुराव यांसारखे पक्षातील बडे या निवडणुकीत निष्प्रभ ठरल्याने हे लाल दिवे काय कामाचे, असा पद्धतशीर प्रचार दोन दिवसांपासून सुरू झाला आहे.
ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्षांनुवर्षे भोंगळ कारभार करूनही देशभरात आलेल्या मोदी लाटेने यंदा शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांना अभूतपूर्व असा विजय मिळवून दिला. पालकमंत्री गणेश नाईक यांचा बालेकिल्ला असलेल्या नवी मुंबईसारख्या शहरात शिवसेनेने तब्बल ४५ हजार मतांची आघाडी घेतली, तर मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या मुरबाड मतदारसंघात भाजपला ४० हजार मते अधिक मिळाली. नाईक, कथोरे यांच्यासारख्यांचे बालेकिल्ले भुईसपाट होत असताना वर्षांनुवर्षे विधान परिषदेचा लाल दिवा मिरविणारे वसंत डावखरे आणि सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूुराव यांचे अस्तित्व मतदारांनी नावालाही शिल्लक राहू दिले नाही. ठाणे शहरात डावखरे यांना मानणाऱ्या नगरसेवकांचा मोठा गट असून उल्हासनगर, अंबरनाथ या शहरांमध्येही त्यांचा चांगला संपर्क आहे. एरवी शीतयुद्धात रमणाऱ्या गणेश नाईक आणि वसंत डावखरे या दोन नेत्यांची लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलजमाई झाली. त्यामुळे संजीव नाईक यांच्या प्रचारात डावखरेंचे चिरंजीव सक्रिय झाले, मात्र जितेंद्र आव्हाड ठाण्यात फारसे फिरकलेच नाहीत. मंत्रिमंडळात नुकत्याच झालेल्या फेरबदलांपासून आव्हाड आणि नाईक यांचे बिनसले आहे. त्यातच नाईक-डावखरे एकत्र आल्याने जितेंद्र आव्हाड यांना मानणारा एक मोठा गट गेल्या काही महिन्यांपासून कमालीचा अस्वस्थ मानला जातो. निवडणूक निकालांमध्ये कळवा-मुंब्य्रात आघाडी मिळताच हा गट पुन्हा एकदा आक्रमक बनला असून जिल्ह्य़ात पक्षाने वाटप केलेल्या लाल दिव्यांनी कोणते दिवे लावले, असा सवाल आव्हाड समर्थक उघडपणे करू लागले आहेत. वसंत डावखरे यांच्या समर्थक नगरसेवकांच्या प्रभागात राष्ट्रवादीला मोठा फटका बसला असून प्रमोद हिंदूुराव यांचे तर अस्तित्वच या निवडणुकीत दिसून आले नाही. तुलनेने किसन कथोरे यांनी भरपूर मेहनत घेऊनही त्यांच्या मतदारसंघात आघाडीला पिछाडीवर राहावे लागले.

जाब कुणाकुणाला विचारणार?
मागील लोकसभा निवडणुकीत ज्या मंत्र्यांच्या मतदारसंघात पिछाडीवर राहावे लागले, अशा मंत्र्यांना शरद पवार यांनी जाब विचारला होता. यंदा मात्र मोदी लाटेवर आघाडीचे सगळेच बालेकिल्ले भुईसपाट झाल्याने जाब तरी कुणाकुणाला विचारणार अशी परिस्थिती असली तरी ठाणे जिल्ह्य़ात मात्र या मुद्दय़ावरून राष्ट्रवादीत नवा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

नव्याने प्रक्रिया सुरू
विकास आराखडय़ासंबधी रखडलेली सुनावणीची प्रक्रिया नव्याने सुरू करण्यासाठी कोकण सहसंचालक नगररचना विभागाने ठाणे जिल्ह्य़ाचे सहाय्यक संचालक नगररचना अधिकारी जितेंद्र भोपळे यांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती केली. १९ ते २२ मेदरम्यान पालघर शहराच्या विकास आराखडय़ावर सुनावणी होणार आहे. ही प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय ठाणे ग्रामीण पोलिसांनी घेतला आहे.