संदीप आचार्य
राज्यात व मुंबईत तीन मे नंतर लॉकडाउन मागे घेताना शासनाला अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. मात्र आरोग्य तज्ज्ञ म्हणून हिरव्या पट्ट्यातील लॉकडाउन मागे घेतानाही तो अत्यंत योजनाबद्धपणे घ्यावा लागेल , असे राज्याचे माजी आरोग्य महासंचालक डॉ सुभाष साळुंखे यांनी सांगितले.

महाराष्ट्र व मुंबईत ३ मे नंतर लॉकडाउन मागे घेण्याबाबत विचारले असता “राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये करोनाचे फारसे रुग्ण नाहीत म्हणजे हिरवे क्षेत्र (ग्रीन झोन) आहे अशा जिल्ह्यातील व्यवहार खुले करताना ते एकदम न करता योजनाबद्ध पद्धतीने करणे गरजेचे आहे. तसेच या जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या पाहिजेत. जेणेकरून बाहेरून करोनाचा संसर्ग होणार नाही. मुंबईचा विचार करताना आपण हॉट स्पॉट, तीव्र हॉटस्पॉट, तसेच क्लस्टर असा विचार करूनच लॉकडाउन बाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. तीन मे नंतर संपूर्ण मुंबईत अथवा एमएमआर विभागात लॉकडाउन वाढवण्याऐवजी हिरवा, केशरी व लाल (ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन) विभागाचा विचार करून निर्णय घेता येऊ शकतो. यासाठी ३० एप्रिलला विभागनिहाय काय परिस्थिती आहे याचा आढावा घेऊनच निर्णय घ्यावा लागेल” असे डॉ साळुंखे यांनी सांगितले.

“मुंबईत धारावी, वरळीसह उपनगरात करोनाची लागण जास्त असल्याचे दिसून येते. आजच्या घडीला मुंबईत ८१३ हॉटस्पॉट असून ३० एप्रिलपर्यंत येथील तसेच अन्य भागातील परिस्थितीचा आढावा घेऊन विभागनिहाय लॉकडाउनचा निर्णय करता येऊ शकेल. मात्र मुंबईसह राज्यात हिरव्या क्षेत्रात लॉकडाउन मागे घेण्याचा निर्णय घेतला तरी तो सरसकट मागे घेणे योग्य ठरणार नाही. हिरव्या क्षेत्रात लॉकडाउन मागे घेताना कालबद्ध पद्धतीनेच त्याची अमलबजावणी झाली पाहिजे” असे आरोग्य तज्ज्ञ म्हणून आपले मत असल्याचे डॉ साळुंखे म्हणाले. मुंबईत रोज वेगवेगळ्या विभागातून करोनाचे रुग्ण आढळत आहेत. धारावीतही रुग्ण संख्या वाढताना दिसते. अशावेळी सुनियोजितपणेच लॉकडाउनची अमलबजावणी करावी लागेल असेही ते म्हणाले.

“मुंबईकरांची घरात बसण्याची मानसिकता नाही. दिवसरात्र धावते ते शहर म्हणजे मुंबई. येथील कोणतीही व्यक्ती स्वस्थ बसणारी नाही तरीही एवढे दिवस लोकांनी लॉकडाउनला चांगल्या प्रकारे सहकार्य केले. आता तीन मे नंतर मुंबईतील हिरव्या क्षेत्रात सरकारने लॉकडाउन मागे घेतला तरी योग्य काळजी घेऊनच त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे”, असे केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ अविनाश सुपे यांनी सांगितले. लॉकडाउनचा विचार करताना प्रत्येक विभाग हा एक जिल्हा आहे असे समजून विचार करणे आवश्यक आहे. विभागातील हॉटस्पॉट तसेच हॉटस्पॉटचे क्लस्टर करून त्यानुसार निर्णय घेतला जावा असेही डॉ सुपे म्हणाले.

“मुंबईत लॉकडाउन मागे घेताना विशेष काळजी घेतली पाहिजे. अजूनही करोनाचे जसे रिपोर्टिंग व्हायला हवे तसे ते होत नाही. पुरेशा चाचण्या होण्याची गरज आहे तसेच ज्या मार्गदर्शक तत्वांचे पालन व्हायला हवे त्यात म्हणावी तेवढी सुसुत्रता नसल्याने ३० एप्रिलपर्यंत हिरवा, केशरी व लाल क्षेत्राचा सखोल आढावा घेऊनच मुंबईत लॉकडाऊन मागे घेण्याचा निर्णय घ्यावा लागेल” असेही डॉ सुभाष साळुंखे यांनी सांगितले.